आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
46 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
बेकायदेशीररित्या डिझेलची तस्करी करणाऱ्या माफियांविरोधात ठाणे गून्हे शाखा घटक एक विभागाने कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे 25 हजार रुपयांच्या डिझेलसह 46 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. डिझेल वाहतूकीला बंदी असतानाही स्वतःच्या आर्थिंक स्वार्थासाठी हा गोरखधंदा चालविणाऱ्या राजू पंडितसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे डिझेल माफिया पुन्हा पोलिसांच्या कचाट्यात सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बेकायदेशरित्या डिझेलची वाहतूक होत असल्याची खबर ठाणे येथील गुन्हे शाखा घटक एक या विभागाला मिळाली. हा टँकर घेऊन चालक ठाणेकडून नाशिकडे जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने गुरुवारी(दि.21) सकाळी ठाणे येथील खारेगाव टोल नाका येथे सापळा रचला. दीर्घ प्रतीक्षेनंतर एक टँकर असल्याचे दिसून आला. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पथकाने टँकर थांबवला. टँकर चालकाची तपासणी करून टँकरमधील मालाची पडताळणी केली. त्यावेळी लाखो लिटरचा डिझेलचा साठा दिसून आला. याप्रकरणी चालक धर्मेंद्रकुमार पटेल याला ताब्यात घेण्यात आले. तसेच टँकरसह 46 लाख 50 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. त्यामध्ये पाच हजारप्रमाणे 25 हजार लिटरचा डिझेलचा समावेश आहे.
याप्रकरणी चालक धर्मेंद्रकुमार पटेल, टँकरचे मालक रितेश सिंग, डिझेल माफिया राजू पंडित, सागर पाटील, रोशन शिरोडकर, नितीन कोळी, अनिल सुरत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगनमतांनी स्वतःच्या आर्थिक हितसंबंधासाठी डिझेलची बेकायदेशीर वाहतूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून याप्रकरणी शिधावाटप अधिकारी सुभाष डुंबरे यांनी तक्रार दाखल केली आहे.
अशी करीत होता डिझेलची वाहतूक
विरार येथील खाडीकिनारी टँकरचे मालक रितेश सिंग, राजू पंडित, अभय सिंग, रोशन शिरोडकर, नितीन कोळी, दिपक पवार ही मंडळी भेटली. त्यांनी बोटीच्या टँकमध्ये भरून आणलेले डिझेल टँकरमध्ये टाकले. त्यानंतर चालक धर्मेंद्रकुमार पटेल याला डिझेलने भरलेला टँकर नाशिककडे घेऊन जाण्यास सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार टँकर नाशिकच्या दिशेने निघाला. त्याच्यासोबत डिझेलबाबत कोणतेही बील अथवा कागद दिले नाही. तो डिझेलने भरलेला टँकर घेऊन नाशिकच्या दिशेने जात होता. दरम्यान खारगांव टोलनाका येथे पोलिसांनी टँकर थांबविले. टँकरचालकाला ताब्यात घेऊन आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
