| पनवेल | प्रतिनिधी |
कोयत्याने कपाळावर, मानेवर, छातीवर वार करून जखमी केल्याप्रकरणी आरोपी मयूर पाटील आणि प्रफुल्ल पवार यांच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.28) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश तळेकर हे विचुंबे येथे राहत असून, आरोपी मयूर पाटील याने व्हॉट्सॲपवर कॉल आणि मेसेज करून वाढदिवसानिमित्त बॅनर बनवून कामोठे येथे पाहिजे असल्याचे कळवले. यावेळी तळेकर यांनी बॅनर तयार करण्यास नकार देऊन बॅनर कामोठे येथे तयार करण्यास सांगितले होते. त्यानंतर आरोपी प्रफुल पवार आणि मयूर पाटील बॅनरचे काम तळेकर यांना देण्यासाठी विचुंब येथील बिल्डिंग खाली गेले. त्यांना बिल्डिंग खाली बोलावून घेतले आणि बॅनर तयार करण्यास सांगितले असता तळेकर यांनी मयूर पाटील याला बॅनर बनवण्यास नकार दिला. या गोष्टीचा राग आल्याने प्रफुल पवार यांनी तळेकर यांची कॉलर पकडली आणि विळ्याच्या आकाराचे कोयत्याने त्यांच्या कपाळावर, मानेवर, छातीवर आणि दंडावर वार केले. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.







