| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात कोप्रोली येथे राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाने प्रेयसीचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवम जाधव (21) असे या तरुणाचे नाव असून पनवेल शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
दोन वर्षांपूर्वी जाधव याची पनवेल येथील 21 वर्षीय पीडित तरुणीशी इंस्टाग्रामद्वारे ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर शिवम याने पीडित तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी शिवमने पीडित तरुणीच्या नकळत स्वतःच्या मोबाईलमध्ये या खासगी क्षणांचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते. दरम्यानच्या काळात काही कारणामुळे वर्षभरापूर्वी या दोघांमधील प्रेमसंबंध तुटले. त्यानंतर पीडित तरुणीने दुसऱ्या तरुणाशी लग्न केले. ही बाब शिवम याला समजल्यानंतर त्याने पीडितेची बदनामी करण्याच्या हेतूने दोघांमधील शरीरसंबंधाचे खासगी व्हिडिओ 16 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर व्हायरल केले. तसेच, पीडित तरुणीच्या परिचयातील तरुणाला व्हॉट्सऍप वर पाठवून दिले. त्यानंतर शिवम याने खासगी व्हिडिओ व्हायरल केल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर व्हिडीओ उरण तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.







