माणगाव पोलिसांचा दणका; सोशल मीडियावरील बुकिंग रडारवर
| माणगाव | प्रतिनिधी |
भिरा येथील देवकुंड धबधब्यावर दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर माणगाव पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उचलला आहे. या प्रकरणात एकूण 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात मृत पर्यटकांसोबत आलेले सहकारी, स्थानिक गाईड तसेच पर्यटकांकडून पैसे घेऊन बुकिंग करणाऱ्या व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती माणगावचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी सोमवारी (दि.13) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर गाईड तसेच बुकिंग घेणाऱ्या व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना संजय बांगर यांनी, देवकुंडसह प्रतिबंधित पर्यटन स्थळांवर पर्यटकांना नेण्यासाठी नेमके कोण-कोण बुकिंग घेत आहेत, सोशल मीडियाद्वारे पर्यटकांशी संपर्क साधून त्यांना कोण आकर्षित करत आहे, याचा सखोल तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच फेसबुक, व्हॉट्सॲप, मोबाईल कॉल, ई-मेल इत्यादी माध्यमांतून पर्यटकांना आमिष दाखवून बेकायदेशीर बुकिंग करणाऱ्यांची कसलीही गय न करता लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, देवकुंड, सिक्रेट पॉईंट, ताम्हिणी घाट आणि कुंभे धबधबा या पर्यटनस्थळांवर सध्या प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने या ठिकाणांसाठी बुकिंग करू नये आणि नागरिकांनीही या परिसरात जाणे टाळावे. बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. तसेच, या दुर्घटनेस कारणीभूत ठरणाऱ्या प्रत्येक दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. या दुर्घटनेनंतरही काही पर्यटक गटांची सोशल मीडियावर बुकिंग सुरू असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली असून, अशा सर्व ग्रुपवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. प्रतिबंधित परिसराच्या सुमारे एक किलोमीटरच्या परिघात आढळणारे पर्यटक, स्थानिक गाईड किंवा संशयित व्यक्तींवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बुकिंग रॅकेटवर गंभीर प्रश्नचिन्ह
प्रतिबंधित पर्यटन स्थळांवरील सुरक्षा, बंदी आदेशांची प्रभावी अंमलबजावणी, बेकायदेशीर पर्यटन व्यवसाय आणि सोशल मीडियाद्वारे चालणाऱ्या बुकिंग रॅकेटवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर माणगाव पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून, बेकायदेशीर पर्यटन साखळीतील प्रत्येक घटकाचा शोध घेत कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रशासनानेही नागरिकांना पावसाळ्यात बंदी आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे आणि जीव धोक्यात घालणाऱ्या पर्यटनाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
