परिसरातील स्थानिकांचा रोजगार बुडाला
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. शासनाच्यावतीने खबरदारीची उपाययोजना म्हणून उपविभागीय दंडाधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी 5 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीसाठी हे आदेश लागू केले आहेत. यामुळे वर्षासहलीसाठी येणार्या उत्साही पर्यटकांच्या उत्साहावर निरुत्साहाचे पाणी पडले आहे. परिणामी पर्याटकांनी या पर्यटन स्थळाकडे पाठ फिरवल्यामुळे ती ओसाड पडली असून या परिसरातील छोटे मोठे उद्योगधंदे करणार्या स्थानिकांचा रोजगार बुडाला आहे.
रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत भिरा गावाजवळील देवकुंड धबधबा, सणसवाडी गावाजवळील सिक्रेट पॉईंट तसचे ताम्हाणी घाट हा परिसर पावसाळी हंगामात पुणे-मुंबई व महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. हि ठिकाणे नैसर्गिक दुर्गम भागात असल्यामुळे तेथे कोणत्याही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यापूर्वी या परिसरात अनेक पर्यटक मृत्यूमुखी पडलेल्या घटना घडल्या आहेत. सिक्रेट पॉईंट या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व ताम्हीणी घाट हा धोकादायक वळणांचा व तीव्र उताराचा असल्याने तसेच दरड कोसळण्याचा संभव असल्याने पर्यटकांची वित्त व जिवीत हानी होऊ शकते. या कारणांमुळे या भागात माणगाव पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळे पर्यटकांना या पर्यटन स्थळापर्यंत जाण्यासाठी मज्जाव करण्यात येत आहे.
परिणामी या परिसरातील छोटे मोठे हॉटेल, खानावळ, चहा टपरी, पान टपरी, मक्का व्यावसायिक तसेच पर्यटकांच्या निवासाची सोय करणारे, फळ व भाजी विक्रेते, रिक्षा व्यावसायिक, परिसरातील पर्यटन स्थळाची माहिती देणारे गाईड या सर्व व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात परीणाम झाला आहे. यामुळे आधीच सुशिक्षित बेरोजगार असणारे गाईड व व्यावसायिकांच्या कुटुंबावर ऐन हंगामात रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. तसेच, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात हि पर्यायाने घट झाली आहे.
तालुक्यातील नैसर्गिक असणार्या या पर्यटन स्थळाला पावसाळ्यात जून ते सप्टेंबर हा चार महिन्याचा कालावधी उत्पन्नाच्या दृष्टीने महत्वाचा असतो. अन्यथा पर्यटक या पर्यटन स्थळाकडे इतर दिवशी फिरकत नाहीत. ऐन हंगामात संचार बंदी केल्याने पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. तर, स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार बुडाला आहे. शासनांनी पर्यटन स्थळे विकसित करून सर्व पर्यटकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आखून सुविधा पुरवल्यास दुर्घटनेला आळा बसेल व स्थानिकांना हि रोजगार मिळवून तालुक्यासह जिल्ह्याचे आर्थिक उत्पन्नात भरीव वाढ होवून रायगड आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.