। तळा । प्रतिनिधी ।
तळा बाजारपेठेत ओले काजूगर विक्रीसाठी दाखल झाले असून चांगल्या भावाने या काजूगरांची विक्री करण्यात येत आहे. तालुक्यातील आदिवासी समाज हा जंगलातील रानमेवा विकून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. तळा बाजारपेठेत सध्या काजूगराला मोठी मागणी असून यावर्षी ग्राहक 150 ते 200 रु. शेकड्याने काजूगर खरेदी करित आहेत. आदिवासी बांधव दिवसभर उंच काटीच्या (आकोटी) सहाय्याने जंगलात ओल्या बिया काढून सायंकाळी घरी घेऊन येतात. दोन दिवस बियांची साठवणूक केल्यावर या बियांमधून अखंड गर काढण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. त्यानंतर या बिया बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. हे काजूगर जवळपास पाऊस सुरू होईपर्यंत मिळत असल्याने आदिवासी बांधवांच्या हाताला काम व पोटाची खळगी भरण्यासाठी आधार मिळतो.