। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील बाहे गावचे कृषीनिष्ठ युवा शेतकरी सचिन हरी देवकर यांच्या कलिंगडाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली आहे. त्यांनी पिकविलेले कलिंगड थेट दुबईला रवाना झाले आहेत.
शेती क्षेत्रात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणारे सचिन देवकर व रूपाली देवकर यांनी या वर्षीच्या शेतीच्या हंगामात आपल्याच शेतात कलिंगड पिकाच्या विकसित बियाण्यांचा वापर करून नवा प्रयोग केला. त्यांच्या या प्रयोगाला चांगले यश मिळून कलिंगड पिकाचे उत्पादनही चांगले आले आहे. याशिवाय फळेही आकाराने मोठी आली आहेत. कलिंगड पिकाचा दर्जा व मोठे फळ आल्याने मुंबईमधील काही कलिंगड व फळ विक्रेते व्यापार्यांनी देवकर यांच्या शेतीतील कलिंगडे खरेदी करणे पसंत केले आहे. मुंबईतील व्यापार्यांनी दुबईतील व्यापार्यांशी संपर्क साधले असता दुबईतील व्यापार्यांनाही कलिंगडे पसंतीस उतरली आहेत. त्यांनी देवकर यांच्या शेतात पिकलेल्या कलिंगड पिकाला योग्य दर देत थेट दुबईची बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.