। तळा । वार्ताहर ।
रोहा-वराठी मार्गे मुरूड रस्त्याची दुरवस्था झालेली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या अधिकार्यांना दिसून येत नसल्याचे प्रवासी वर्गाकडून बोलले जात आहे. त्यासाठी ग्रामस्थ व वाहनचालक आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
खारीगांव काजूवाडी ते उसरपर्यंतच्या रस्त्याच्या साईडपट्ट्या जवळपास फूट दिड-फुट खचलेल्या असून दगडगोटे बाहेर आले आहेत. त्यात हा रस्ता अरुंद आहे. रस्त्याच्या वळणावर झाडी झुडपे वाढलेली आहेत. यामार्गावरुन एसटी बस, मोटारसायकली, रिक्षा, डबर-वाळुचे डंम्पर, टेम्पो या वाहनांची सतत वर्दळ असते. तसेच, मार्गावरून मुरूडकडे पर्यटक मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी येत असतात. त्यांना या रस्त्याची सवय नसल्याने समोरून एखादे मोठे वाहन आल्यास आलिशान गाडीवाले मालक-चालक वाहन साईटपट्टीवर उतरवत नाहीत. गाडी पास करताना मोठी कसरत करावी लागते. वेळप्रसंगी वाहनचालकांची बाचाबाची होऊन त्याचे मोठ्या भांडणात रुपांतर होते.
या गंभीर समस्येकडे कृषीवलच्या माध्यमातून वेळोवेळी लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रिस्त अवस्थेत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग येण्यासाठी ग्रामस्थ व वाहनचालक आंदोलन छेडणाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.