वाहनचालकांना करावी लागतेय कसरत
। सुकेळी । वार्ताहर ।
मुंबई-गोवा मार्गावर वाकण पुलावरती सद्यपरिस्थितीत मोठ्या प्रमाणात मोकाट गुरांचा सुळसुळाट असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जणु काही या गुरांनी रस्त्यावर रास्ता रोको केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आधिच महार्गावर पडलेल्या महाभंयकर खड्ड्यांमुळेे तसेच सध्याच्या रस्त्यावरील वाढत्या मोकाट गुरांच्या संख्येमुळे वाहनचालकांना वाहन चालवताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या मोकाट गुरांच्या दिवसेंदिवस वाढत्या संख्येमुळे या गुरांना कोणी वाली आहे की नाही? ही गुरे रस्त्यावरती अशीच मोकाट सोडुन देण्यात आली आहेत की काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या गुरांचे कळप रस्त्याच्या मध्येच ठाण मांडुन बसलेले असतात. यांच्यामागे कोणीच गुराखी दिसुन येत नाही. तसेच वाहनचालकांना जाण्यासाठी रस्ताच मोकळा नसल्यामुळे गाडीचा हॉर्न वाजवूनसुद्धा गुरे बाजुला होत नाहीत. शेवटी वाहनचालकांना गाडी उभी करुन गाडीतुन उतरुन गुरांना बाजुला करावे लागत आहेत. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात फिरणार्या मोकाट गुरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनचालकामधून होत आहे.