| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याचा आणि त्याला रोखताना प्रवाशाने हात गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला वाचवण्याच्या नादात प्रवाशाने ट्रेनमधून उडी मारली असताना त्यांचा हात ट्रेनच्या चाकाखाली आला. लोकमान्य टिळक टर्मिनस-नांदेड ट्रेनमध्ये ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल येथे राहणारे डॉ. दीपाली देशमुख (44) आणि त्यांचे पती योगेश देशमुख (50) बुधवारी रात्री लातूर येथे नातेवाईकाकडे जाण्यासाठी निघाले होते. मुलीसह विशेष ट्रेनने ते निघाले होते. महिला डॉक्टर मधल्या आणि पती वरच्या बर्थवर झोपले होते. मध्यरात्री 3.35 च्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती ट्रेनच्या डब्यात घुसली आणि महिलेची पर्स खेचत चोरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान महिलेने चोरी रोखण्याचा प्रयत्न केला. या सर्व झटापटीत महिला ट्रेनच्या दरवाजातून खाली पडली. यादरम्यान पतीने तिला वाचवण्याच्या प्रयत्नात धावत्या ट्रेनमधून उडी मारली. मात्र, त्यांचा हात ट्रेनच्या चाकाखाली आला.
चोरीमुळे धक्का बसलेला असताना आणि जखमी असतानाही महिलेने जखमी पतीला रेल्वे ट्रॅकपासून दूर नेत मार्ग काढत रस्ता गाठला. तेथून जाणारा टेम्पो आणि रिक्षाचालकाच्या मदतीने तिने पतीला मुलुंडच्या फोर्टिज रुग्णालयात नेलं. तिथे त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. दुसरीकडे चोर मात्र पर्स घेऊन पळ काढण्यात यशस्वी झाला. घटनेची माहिती मिळताच जीआरपीला तात्काळ कळवण्यात आलं. यानंतर त्यांनीही तात्काळ सूत्रं हलवली. दांपत्याच्या मुलीला कल्याण स्थानकात सुरक्षितपणे ट्रेनमधून उतरवण्यात आलं.