रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची प्रमुख उपस्थिती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 व जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयाच्या आवारात भव्यदिव्य असा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.
यावेळी जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप, तालुका सहाय्यक निबंधक श्रीकांत पाटील, सहकार खात्यातील अधिकारी, कर्मचारी, बँका व पतसंस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यालयाच्या आवारात वीसहून अधिक वेगवेगळ्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. अलिबाग तालुक्यामध्ये कमळ नागरी सहकारी पतसंस्थेने देऊळ भेरसे, खानाव येथे 200, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत 100, श्री कृपा नागरी पतंस्थेमार्फत 50, सरखेल कान्होजी आंग्रे ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेमार्फत 100, गृहलक्ष्मी नागरी सहकारी पतंस्थेमार्फत वीस व इतर संस्थामार्फत 30 असे एकूण 500 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.