शिवराज्याभिषेक दिन सोहळा जल्लोषात साजरा
| महाड | उदय सावंत |
स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवाजी महाराज यांचा गड अभेद्य असणाऱ्या किल्ले रायगडवरील प्राधिकरणची कामे तातडीने पूर्ण करावी, अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगडवर पाऊल ठेवू नये, असा गंभीर इशारा छत्रपती संभाजी राजे यांनी दिला. किल्ले रायगडवरील 100 वर्षांपूर्वीची अतिक्रमणे काढत असताना गडावर असणाऱ्या धनगर समाजाच्या पाठीशी राजे खंबीरपणे उभा आहे, असा इशारा पुरातत्व खात्यालासुद्धा छत्रपती संभाजी राजे यांनी दिला आहे.
किल्ले रायगडावर 351 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध कार्यक्रम संपन्न झाले. याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण विभाग संजय दराडे,जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
दिनांकनिहाय हा सोहळा लोकोत्सव होऊन शिवभक्तांना प्रेरणा देणारा आहे. या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने शिवभक्त, महिला भगिनी उपस्थित होत्या. 4 जून रोजी विविध कार्यक्रम संपन्न झाले, तर मुख्य राज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सुवर्ण होणांचा अभिषेक करण्यात आला. यानंतर उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन करताना शिवाजी महाराजांचे विचार छत्रपती संभाजी राजे यांनी दिले.
यावेळी बोलताना संभाजी राजे यांनी किल्ले रायगडप्रमाणे राज्यातील 25 किल्ले ताब्यात द्यावे, असे सांगत या किल्ल्यांचे जतन व संवर्धन आम्ही शासनाच्या पैशातून नव्हे, तर शिवभक्तांच्या देणगीमधून करू असे सांगत गेली 20 वर्षे आम्ही मागणी करत आहोत, मात्र राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याची खंत व्यक्त केली.
25 किल्ल्यांचे जीर्णोद्धार व संवर्धन करत संपूर्ण जगाला हेवा वाटेल असे काम आम्ही करू असे सांगत छत्रपती शिवाजी राजे यांचे विचारे जगभर पोहोचले असून, हा राज्याभिषेक सोहळा दिन आता लोकोत्सव झाला असून, तरुणांची संख्या लक्षणीय आहे, ही ताकद वाढत जाणार आहे. गेली अनेक वर्षे शिवभक्त हे गडावर कोणत्याही प्रकारचा गदारोळ, गोंधळ न करता येत असतात, याचा मला अभिमान असल्याचे सांगत शिवभक्तांना सलाम केला.
मोठ्या उत्साहात झालेल्या सोहळा कार्यक्रमासाठी या ठिकाणी कडक बंदोबस्तासह सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती मार्फत विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या सोहळ्यानिमित्त विविध शासकीय विभाग व जिल्हा प्रशासनाने अन्नछत्र, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, सावलीसाठी मंडप, मोफत बससेवा आदी सुविधा मोठ्या प्रमाणात पुरविण्यात आल्या होत्या. हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिवभक्त या ठिकाणी महाराजांना वंदन करण्यासाठी आले होते.
सरकारचे दुर्लक्ष
किल्ले रायगडप्रमाणे राज्यातील 25 किल्ले ताब्यात द्यावे, या किल्ल्यांचे जतन व संवर्धन आम्ही शासनाच्या पैशातून नव्हे, तर शिवभक्तांच्या देणगीमधून करू असे सांगत गेली 20 वर्षे आम्ही मागणी करत आहोत, मात्र राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याची खंत छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केली.
पुढच्या वर्षी स्वतः गडावर तंबू टाकणार
किल्ले रायगडावर दमलेले शिवभक्त पायरी मार्गावर इतर ठिकाणी झोपले होते, त्यांच्याकडे बघून पुढील वर्षी आपण स्वतः गडावर तंबूत टाकून वस्ती करणार असल्याचे त्यांनी संभाजी राजे यांनी जाहीर केले.