। नागपूर । प्रतिनिधी ।
नागपूर पोलिसांनी जरीपटका परिसरात मोठी कारवाई करत दोन अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. नितेश विखाणी आणि आकाश केवलरामणी अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जरीपटका परिसरातील चावला चौक येथे दोन तरुण अमली पदार्थची विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ कारवाई करत छापा टाकला. या छाप्यात नितेश विखाणी (28) आणि आकाश केवलरामणी (26) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच, या कारवाईत दोघांकडून सुमारे 5 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे 50 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, आरोपींनी हे अमली पदार्थ कुठून आणले, कोणाच्या माध्यमातून ते नागपूरमध्ये वितरित करत होते, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.