। पुणे । प्रतिनिधी ।
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असतानाच एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील सर्व सांडपाणी प्रक्रिया प्लॅण्टमध्ये कोरोना विषाणूचे जनुकीय अंश सापडले असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेच्या (एनसीएल) तपासातून समोर आली आहे.
पुणे शहरातील 10 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमधील पाण्याचे नमुने दर आठवड्याला तपासले जातात. या तपासणीत 40 ते 60 नमुन्यांचा समावेश असतो. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, गेल्या काही आठवड्यांपासून या सर्व नमुन्यांमध्ये कोरोना विषाणूचा अंश आढळून आला आहे.
राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेकडून 22 एप्रिल आणि 6 मे रोजी घेण्यात आलेले सांडपाण्याचे नमुने पॉझिटिव्ह आढळले असून, या सांडपाण्यात मिळालेल्या विषाणूंच्या जनुकीय अंशांची पातळी ही कोविड काळात जशी होती, तशीच आताही आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये सतर्कतेची गरज निर्माण झाली आहे.