| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकावर आज (दि.4) भीषण आग लागल्याची घटना घडली. स्थानकात असलेल्या मॉन्जिनिज केकशॉपमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली होती. त्यानंतर अग्निशमन दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं. मात्र या आगीमुळे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात उठल्याने प्रवाशांची एकच धावपळ झाल्याचं दिसून आले. दरम्यानच्या काळात काही वेळेसाठी स्टेशनचे मुख्य गेट बंद करण्यात आले होते. ते आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चर्चेगेट स्टेशनमध्ये गुरुवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आग लागल्यानंतर त्या ठिकाणी धुराचे लोट दिसायला लागले. या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी घरी परत जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी होती. त्याचवेळी ही आग लागल्याने स्टेशनमधील कॉरिडॉरमध्ये धूरच धूर दिसायला लागला. त्यानंतर लगेच कॉरिडॉर आणि त्याला जोडणारा भूयारी मार्ग बंद करण्यात आला. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल त्या ठिकाणी लगेच पोहोचलं. त्यांनी काहीच वेळेत ही आग आटोक्यात आणली. ज्या केकच्या दुकानात ही आग लागली होती त्यामधील वस्तू या जळून खाक झाल्या आहेत.