कृषीवलने आवाज उठवताच प्रशासनाची धावाधाव
| पाताळगंगा | वार्ताहर |
चौक ग्रुप ग्रामपंचायतीने मागील अडीच वर्षांपासून चौक, तुपगाव, पाली खुर्द या परिसरातील धनिक व बिल्डर्स यांनी गटारांचे सांडपाणी नैसर्गिकरित्या नाल्यात सोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमीन नापीक होत आहे. संतप्त शेतकऱ्यांनी तक्रारी करुनही संबंधित प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे बाधित शेतकरी यशवंत सकपाळ यांच्यासह अन्य शेतकरी 5 जून फाशी घेणार होते. याबाबत कृषीवलने आवाज उठवून शेतकऱ्यांची बाजू लावून धरली. त्यानंतर संबंधित प्रशासनाची धावाधाव झाली. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्थळपाहणी करुन लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी फाशी घेण्याचा निर्णय स्थगित केला. दरम्यान, बाधित शेतकऱ्यांनी कृषीवलचे आभार मानले आहेत.
मंगळवारी शासकीय व ग्राम पंचायतीचे अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून झाल्यानंतर आ. महेश बालदी यांच्या ग्रामनिधी फंडातून सदरचे काम पूर्ण होणार असल्याचे बाधित शेतकऱ्यांना सांगितले आहे. त्याचबरोबर स्मशानभूमीजवळ साकव बांधण्यात येणार आहे.तसेच बाधित शेतकऱ्यांच्या शेतातून गटार काढण्यात येणार असून, दिलेल्या आश्वासनप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत आवश्यक तो फंड लवकरात लवकर आणेल, अशी ग्वाही देण्यात आली.
यावेळी पंचायत समिती शाखा अभियंता अनिल जाधव, अल्पना जाधव यांनी बाधित शेतकऱ्यांच्या शेतीची व नुकसानीची स्थळाची पाहणी केली. तसेच चौक सरपंच ऋतू ठोंबरे, उपसरपंच सुभाष पवार, तुपगाव उपसरपंच सचिन साखरे, निखिल मालुसरे, पंचायत सदस्य अजिंक्य चौधरी, वृषाली आंबावणे, ग्रामविकास अधिकारी एस.पी. जाधव, शेतकरी कुंडलिक ठोंबरे, गणेश देशमुख, सचिन सकपाळ, हनुमंते, गुरव, कोंडीलकर बंधू, तसेच खालापूर तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस प्रशासन यांनी ग्रामपंचायतीला बाधित शेतकऱ्यांना फाशीपासून परावृत्त करुन सहकार्य करावे, असे कळविण्यात आले आहे.