जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीतील वाद विकोपाला
| माणगाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील वाद खा. सुनील तटकरेंनी महाड येथील कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांच्या नॅपकिनबद्दल मिमिक्री करीत चेष्टा केल्याने विकोपाला पोहोचला आहे. शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना रायगड जिल्ह्यातील गद्दारीचा बादशहा सुनील तटकरे असल्याची जोरदार टीका केली आहे.
जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी सुनील तटकरेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे आव्हान दिले. माजी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी पाठीमागून वार करायची तटकरेंची गेल्या अनेक वर्षांची परंपरा असून, त्यांचे राजकारण केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी व कुटुंबासाठी असल्याचा घणघाती आरोप केला. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे, तालुका प्रमुख ॲड. महेंद्र मानकर, उपतालुका प्रमुख सुधीर पवार, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, लोणेरेचे माजी सरपंच रवींद्र टेंबे, विभाग प्रमुख मनोज सावंत, प्रताप घोसाळकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना अरुण चाळके म्हणाले की, गेल्या चार-पाच दिवसांपासून जी राजकीय धुसफूस सुरु आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत. सुनील तटकरे हे ज्याप्रमाणे वागताहेत, तसे त्यांचे पाय खोलवर खड्ड्यात जात आहेत. त्यांना शिवसेनेने निवडून आणून नवसंजीवनी देऊन खासदार केले आहे. पण, तटकरेंना याची जाणीव नाही हे त्यांच्यात असणारे अत्यंत वाईट गुण असून, त्यांनी ते सिद्ध करून दाखवले आहे. त्यांची मंत्री भरत गोगावले यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही. तटकरेंनी कर्जत मतदारसंघातून सुधाकर घारेंना उभे करून महायुतीचे आ. महेंद्र थोरवे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पण, तरीदेखील थोरवे यांनी या मतदारसंघातून बाजी मारली. महाडमध्ये भरतशेठना त्यांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील गरीब जनतेच्या आशीर्वादाने भरतशेठ निवडून आले.
रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा जो तिढा आहे, त्याला तटकरेच कारणीभूत आहेत. रायगडच्या जनतेला आता भरतशेठ पालकमंत्री म्हणून हवे आहेत. तुम्ही कितीही वल्गना करा, तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही. तुम्ही फक्त तुमचे कुटुंब चालवता. रायगड जिल्हा तुम्हाला आंदण दिले आहे काय? रायगड जिल्ह्यात तुम्ही कोणते विकासाचे प्रकल्प आणलेत? विधानसभा निवडणुकीत आमच्या सर्व शिवसैनिकांनी एक दिलाने काम करून आदितीला निवडून आणले. मुंबई-गोवा महामार्गाचे जे काम रखडले आहे, त्याला तटकरेच जबाबदार आहेत. जाणूनबुजून त्यांनी महामार्गाचे काम रखडून ठेवले आहे. उद्याच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. या निवडणुकात शिवसेना व भाजप मोठे यश संपादन करेल.
यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर म्हणाले की, गेल्या आठ दिवसांपासून रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत जो कलगीतुरा चालला आहे, त्याला तटकरेच कारणीभूत आहेत. तटकरे यांनी भरत गोगावले यांची नक्कल केली नसती तर हा विकोप वाढला नसता. सुनील तटकरे जे बोलतात विकास केला, त्यांनी काय विकास केला? गेली 17 वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. हे काम त्यांना दोन वेळा खासदार, आमदार, मंत्री होऊनही मार्गी लावता आलेले नाही. तटकरेंनी केवळ ठेकेदार नेमले ते फक्त ठेके मिळवण्यासाठी. बॅरिस्टर अंतुले हे खासदार असताना त्यांनी आरसीएफ, आंबेतचा पूल, लोणेरे विद्यापीठ असे अनेक मोठमोठे प्रकल्प आणून जिल्ह्याचा विकास केला.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना माजी उपजिल्हा प्रमुख अनिल नवगणे म्हणाले की, गेल्या चार-पाच दिवसांपासून तटकरे भरतशेठवर टीकाटिप्पणी करून त्यांची चेष्टा करीत आहेत. अखंड महाराष्ट्रात मंत्री भरतशेठ हे चांगले काम करीत असून, त्यांच्यावर टीकाटिप्पणी कोणी करीत असेल तर यापुढे ते खपवून घेतले जाणार नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त घरातल्या व्यक्तींकडेच महत्त्वाची पदे असावीत, दुसऱ्याला कधी मोठे होऊ द्यायचे नाही, असे त्यांचे राजकारण असल्याची जोरदार टीका नवगणे यांनी केली.