प्रशांत नाईक यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुरुस्तीची मागणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग शहराचे प्रवेशद्वार असलेल्या चेंढरे बायपास, निलिमा हॉटेल, रेवदंडा बायपास रोड जंक्शन या परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. खड्डेमय रस्ता तात्काळ दुरुस्त करा, अशी मागणी अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. अन्यथा स्वखर्चाने रस्ता दुरुस्त करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. याबाबत बांधकाम विभागाकडे निवेदन दिले आहे.
अलिबाग शहराच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून खड्ड्यांचे साम्राज्य आहे. तक्रार केल्यावर फक्त तात्पुरती डागडुजी केली जाते. त्यानंतर जैसे थे अशी परिस्थिती निर्माण होत आहे. खड्डे वाचविताना अनेकवेळा अपघात होत आहेत. रस्त्यावरून ये-जा करताना विद्यार्थी व पालकांना कसरत करावी लागत आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचेदेखील खड्ड्यांमुळे हाल होत आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे अनेक वेळा वादही होत आहेत. अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. त्यामुळे पर्यटकांसह नागरिकांची हजारोंच्या संख्येने या ठिकाणी वर्दळ असते. अलिबाग शहराच्या प्रवेशद्वारासमोरच असलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करून नागरिकांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा हा रस्ता स्वखर्चाने करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी प्रशांत नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.