नागोठण्यातील जंगलात गुरांची कत्तल

पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या

| नागोठणे | प्रतिनिधी |

गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तल करून त्यांच्या मांसाचे तुकडे करत असलेल्या तिघांच्या नागोठणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यात मिरानगर येथील मुझफ्फर इकबाल पानसरे, नवाब मोहम्मद शेख व समीर अयुब शेख या तिघांचा समावेश आहे. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.3) मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागोठण्यातील मिरानगर भागात असलेल्या जंगलात गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तल होत असल्याची माहिती गुरुवारी (दि.2) नागोठणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार नागोठणे पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास घटनास्थळी धाड टाकली. यावेळी तीघेजण गोवंश जातीच्या दोन प्राण्यांची कत्तल करून त्या प्राण्यांच्या मांसाचे तुकडे करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दरम्यान, पोलिसांना पाहताच तेथून पळून जाणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी 2 गोवंश प्राण्याचे कत्तल करण्यात आलेले मांस जप्त करण्यात आले असून, एका गाईला वाचवण्यात यश आले आहे. जप्त केलेल्या गोमांस मालाची एकूण किंमत 30 हजार 660 रुपये असल्याची माहिती नागोठणे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version