। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गेले कित्येक दिवस अलिबाग तालुक्यातील मिळकतखार येथे सुरु असलेल्या वासवाणी कंपनीच्या जागेतील बेकायदेशीर भरावाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. सुरवातीला जेएसडब्ल्यू कंपनीची स्लॅग भरावासाठी वापरण्यात आली. मात्र ग्रामस्थांनी याबाबत आवाज उठविताच जेएसडब्ल्यू कंपनीने माघार घेतली. त्यामुळे ठेकेदाराने स्लॅग लपविण्यासाठी चरी येथील कुरकुंडी कोलटेंभी परिसरातील गुरचरण जागेतील माती याठिकाणी टाकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही जमिन कागदोपत्री दुग्ध विकास विभागाची असून भूमाफियांनी अधिकार्यांना हाताशी घेत बेकायदेशीर उत्खनन करण्याचा प्रताप केला आहे. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मिळकतखार येथील ग्रामस्थांचा विरोध झुगारुन वासवाणी कंपनीच्या मालकांनी राजकिय नेत्यांचा आधार घेत अनधिकृत भरावाला सुरुवात केली. प्रशासनानेही आर्थिक हितसंबंध जोपासत अनधिकृत भरावाला खतपाणी घातले. अखेर ग्रामस्थांनी कृषीवलकडे मदतीचा हात मागितला. कृषीवलने अन्यायाविरोधात लढा देत वासवाणींचे काम बंद केले. मात्र काही दिवसांनी पुन्हा माफियांनी रात्रीचा खेळ सुरु केला. त्यामुळे या सर्व प्रकाराकडे अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
हे ट्रक कुणाचे?
मिळकतखार येथे बेकायदेशीर भराव करण्यासाठी ठेकेदाराने ट्रक क्र. एमएच 06.एक्यू.1591 या वाहनांचा वापर केल्याचा उल्लेख तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अलिबाग यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये आहे. तसेच हाच ट्रक चरी येथील उत्खनन करीत असल्याचा व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. त्यामुळे या वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची तसेच त्यांना सहआरोपी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अलिबाग तालुक्यातील चरी येथील गुरचरण जागेमध्ये खोदकाम करण्यात आले. त्याठिकाणी पाहणी केली. परंतु कोणी सापडले नाही. याबाबत ग्रामसेवक यांना कारवाई करण्याची सुचना केली आहे. याबाबत त्यांना पत्र दिले आहे.
विक्रम पाटील,
तहसीलदार अलिबाग