पोलस अधीक्षकांना हप्ते देऊन बांधल्याचा माफियांकडून आरोप
| अलिबाग | कृषीवल टीम |
रायगड जिल्ह्यातील डिझेल तस्करीचा सीमा शुल्क विभागाने पर्दाफाश केला होता. पाच टँकर व दोन बोटी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेने एक वेगळे वळण घेतल्याचे चित्र समोर आले आहे. अलिबागमधील रायगडच्या एसपींना हप्ता दिला जात असल्याचा आरोप डिझेल माफिया शेख यांनी एका ऑडीओ क्लीपद्वारे केला आहे. त्यामुळे रायगडच्या एसपींना हे प्रकरण भोवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अरबी समुद्रमार्गे रेवदंडा खाडीतून डिझेल तस्करी होत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार सीमा शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचत सोमवारी पहाटेच्या सुमारास छापा टाकला. डिझेल वाहून नेणारे 32 हजार लिटर क्षमतेचे 4 आणि पाच हजार लिटर क्षमतेचा एक असे 5 टँकर तसेच मासेमारी करणाऱ्या दोन बोटी ताब्यात घेतल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या हजारो लिटर डिझेलची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे.
मासेमारीच्या नावाखाली ‘कुलदैवत साईखंडोबा’ आणि ‘साईलक्ष्मी’ नावाच्या बोटींमधून खुलेआम डिझेलची वाहतूक केली जात होती. रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कुंडलिका खाडीकिनारी रेवदंडा बंदराचा वापर डिझेल तस्करीसाठी राजरोसपणे सुरु होता. रेवदंडा पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस अवघ्या 200 मीटर अंतरावर असलेल्या या बंदरावर सुरु असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई करण्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष का केले, अशा प्रकारची चर्चा सुरु झाली आहे. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेतले आहेत. त्यामध्ये इफीयाज शेख, कुंदन म्हात्रे, समीर आणि प्रवीण यांचा समावेश आहे. यातील शेख याने डिझेल तस्करी करण्यासाठी रायगडच्या पोलीस अधीक्षकांना हप्ते देऊन गप्प केल्याची ऑडीओ क्लीप व्हायरल होत आहे. त्यामुळे रायगडच्या एसपींना हे प्रकरण भोवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे कुंपणच शेत खात असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.
दरम्यान, सागरी किनाऱ्यावरील सुरक्षेचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. डिझेल तस्करीमुळे अर्थ व्यवस्थेवर परिणाम होत असताना समुद्रातील जीवसृष्टीवरही गंभीर प्रभाव पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
ऑडीओ क्लीप व्हायरल
दोन दिवसांपूर्वी रेवदंडा येथे कस्टम विभागाने डिझेल तस्करीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणानंतर डिझेल तस्करीतील आरोपी इफीयाज शेख याची रायगडच्या कमिशनरसोबतही आर्थिक हितसंबंध असल्याची ऑडिओ क्लिप जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कार्यावर नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून यापुढे डिझेल तस्करीबाबत पोलिसांची काय भूमिका असणार, याकडे संपूर्ण रायगडकरांचे लक्ष लागले आहे.
डिझेल तस्करीबाबत एलसीबी अनभिज्ञ का?
जिल्ह्यातील वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करण्याबरोबरच अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा ही स्वतंत्र यंत्रणा आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे या टीमचे प्रमुख आहेत. या विभागात सुमारे 35हून अधिक कर्मचारी आहेत. एक अधिकारी व पाच कर्मचारी असे चार पथक तयार केले आहेत. या पथकामार्फत अवैधधंद्याची माहिती खबऱ्यांकडून मिळवण्याचे काम केले जाते. त्यांनंतर वरिष्ठांना सांगून कारवाई केली जाते. परंतु, रेवदंडा येथे सुरु असलेल्या डिझेल तस्करीबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अनभिज्ञ का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा विभाग नक्की काय करतो, अशी शंका नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे.
रेवदंडा पोलिसांवर कारवाई होणार का?
श्रीवर्धनमधील शेखाडी खाडी किनारी 1992 च्या दरम्यान आरडीएक्सचा साठा सापडला होता. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली होती. त्यावेळी पोलीस निरीक्षकासह पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निलंबित केले होते. त्यानंतर सागरी किनारा मजबूत करण्यासाठी पोलीस दलाकडून वेगवेगळे प्रयत्न सुर केले. सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.परंतु रेवदंडा बंदरावरील डिझेल तस्करीकडे रेवदंड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच, याप्रकरणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे काय भूमिका घेणार, याकडेही लक्ष लागून राहिले आहे.
सागरी किनारे असुरक्षित
1992 मध्ये साखळी बॉम्ब स्फोट व 26 /11 दहशतवादी हल्ले सागरी मार्गाने झाले होते. या हल्ल्यानंतर सागरी किनारे सुरक्षेच्या दृष्टीने भक्कम करण्यासाठी अलिबाग, वरसोली समुद्रकिनारा, रेवस बंदर, रेवस पकटी, मांडवा बंदर, आगरदांडा प्रवासी वाहतूक, जंगल जेट्टी, राजपूरी, धरमतर जेट्टी, धरमतर पोर्ट, बागमांडला जेट्टी, दिघी प्रवासी जेट्टी, दिघी पोर्ट, सानेगाव जेटी, पीएनपी जेट्टी, सानेगाव जेट्टी, जेएसडब्लू जेट्टी अशा ठिकाणी 150 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सागरी किनारा रात्रीच्यावेळी संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम सीसीटीव्ही कॅमेरे करीत आहेत. या सीसीटीव्ही कॅमेरांपासून सागरी सुरक्षा भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, रेवदंडा बंदरावरून डिझेल तस्करी मध्यरात्रीच्या सुमारास होत आहे. याकडे रेवदंडा पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने सागरी किनारे असुरक्षित असल्याचे चित्र आहे.