| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील सार्वजनिक दूरसंचार यंत्रणेच्या सुरक्षिततेला आव्हान देणाऱ्या चोरीच्या प्रयत्नावर माणगाव पोलिसांनी वेळीच कारवाई करत दोन संशयित चोरट्यांना रंगेहाथ पकडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निजामपूर येथील बीएसएनएल कार्यालयाच्या परिसरात असलेल्या साहित्यावर चोरट्यांची नजर होती. 21 ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे 3.30 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप कापून आत प्रवेश केला. त्यानंतर तेथील तांब्याच्या तारा कापून नेण्यासह इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्या चोरण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यावेळी परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांनी संशयित हालचाली ओळखल्या. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले. बाळू ऊर्फ किशोर ज्ञानेश्वर नागमार (30) आणि शाबीर मोहम्मदअली शेख (23) अशी पकडलेल्या चोरट्यांची नावे असून, या दोघांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्ह्यांची नोंद आहे. यावेळी त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह सुमारे 9 लाख 18 हजार 750 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती रायगड पोलिसांच्या प्रसिद्धिपत्रकातून देण्यात आली आहे.
बीएसएनएल टॉवरवर चोरी करताना जेरबंद
