। माणगाव । प्रतिनिधी ।
आगामी काळात साजर्या होणार्या गणेशोत्सव व नवरात्र उत्सव सणाच्या अनुषंगाने माणगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी व माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव शहरांमध्ये पोलीस ठाणे येथून कचेरी रोड-मोर्बा नाका-माणगाव बाजारपेठ मुंबई- गोवा महामार्गाने एसटी स्थानकापर्यंत रूटमार्च काढण्यात आला. त्यानंतर माणगाव बस स्थानक आवारात दंगा काबू योजना प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रात्यक्षिकाला 2 अधिकारी व 22 पोलीस अंमलदार व माणगाव आर.सी.पी.प्लाटून 30 अंमलदार उपस्थित होते.
गणेशोत्सव, उत्सव व नवरात्रोउत्सव काही दिवसावर येवून ठेपला असताना माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून माणगाव पोलिसांनी शांतता समितीच्या बैठका घेतल्या. त्यानंतर लागलीच माणगाव विभागातील पोलीस दक्ष झाले असून माणगाव पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी माणगाव बाजारपेठेतून रूट मार्च काढीत दंगा काबू प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी व माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. त्यानंतर रंगीत तालमीची सांगता करण्यात आली.