शिवप्रेमींचा उद्रेक; उद्यान पर्यवेक्षकाचे निलंबन
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
शहरातील मारुती मंदिर येथील शिवसृष्टीमध्ये असलेल्या मावळ्यांची तोडफोड केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. सकाळच्यावेळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शिवप्रेमींनी नगर परिषदेचे उद्यान पर्यवेक्षक नितीन यादव यांना संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांनी कुणाचेच फोन घेतले नाहीत. यानंतर शिवप्रेमी नगर परिषदेत दाखल होत त्यांनी मुख्याधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले होते. तसेच, उद्यान पर्यवेक्षकांच्या निलंबनाचा विषयदेखील लावून धरला होता.
मारुती मंदिर येथील शिवसृष्टीमध्ये असलेल्या मावळ्यांची तोडफोड केल्यानंतर त्याच्या संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागल्या आहेत. नगर परिषदेचे उद्यान निरीक्षक नितीन यादव यांना संपर्क साधण्यात आला. पंरतु, त्यांनी कोणाचाच फोन उचलला नाही. यांनंतर शिवप्रेमी संघटनांनी थेट पोलीस स्थानकात धाव घेत सीसीटीव्ही सुरू केव्हा होणार, अशी विचारणा केली. मात्र, मारुती मंदिर परिसरात नगर परिषदेची जबाबदारी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आणि संतप्त जमाव नगर परिषदेत येऊन धडकला. यावेळी शिवप्रेमींनी मुख्याधिकार्यांना फोन करत तात्काळ येण्याचे सांगण्यात आले. मुख्याधिकारी नगर परिषदेत दाखल झाल्यानंतर त्यांच्या दालनात चांगले घमासान पहायला मिळाले. यावेळी शिवप्रेमींनी मुख्याधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले होते. कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही पुतळे उभारता आणि 10 हजारचा साधा सीसीटीव्ही तुम्हाला सुरक्षेसाठी लावता येत नाही, असा सवाल संतप्त शिवप्रेेमींकडून करण्यात आला.
तसेच, उभारलेल्या पुतळ्यांची जबाबदारी कोणाची? एवढे प्रकार घडले तरी तुम्हाला जाग येत नाही. तुम्ही काही घडावं याची वाट पाहताय का? तात्काळ उद्यान पर्यवेक्षकाला निलंबित करा अन्यथा याच ठिकाणी उद्रेक होईल, असा इशारा हिंदूत्ववादी संघटनांनी दिल्यानंतर मारुती मंदिर येथील मावळ्यांच्या तोडफोड प्रकरणी उद्यान पर्यवेक्षकाला 2 दिवस निलंबित केल्याचे घोषणा मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केली आहे. तसेच, याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करून पुढील अहवालानंतर कारवाई केली जाईल, असे आश्वासनदेखील दिले.
गरज नसतानाही पुतळ्यांची उभारणी
कुणाच्याही मनात आले की लगेच शहरात पुतळे उभे राहतात. रत्नागिरीकरांची मागणी नसताना असे पुतळे का उभारले जात आहेत? यापुढे रत्नागिरीत एकही पुतळा उभारू नका. तुम्हाला पुतळ्यांना सुरक्षा देता येत नसेल तर शहरातील सर्व पुतळे आमच्या ताब्यात द्या, आम्ही सीसीटीव्ही स्वखर्चाने बसवतो, असे संतप्त शिवप्रेमींनी मुख्याधिकार्यांना सांगितले.
सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार
यावेळी मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी एक लेखी पत्र शिवप्रेमींना दिले आहे. 24 तासांत शहरातील पुतळ्यांजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. तसेच, पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी 24 तास सुरक्षारक्षक तैनात केले जाणार असल्याचे बाबर यांनी शिवप्रेमींना सांगितले. यानंतर शिवप्रेमी घोषणाबाजी करत कार्यालयातून बाहेर पडले.