मेढेखार येथे कागदी लगद्यापासून हजारो गणेशमूर्ती
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
वाढत्या प्रदुषणाला रोखण्यासाठी अलिबाग तालुक्यातील बांधण येथील कौस्तुभ पाटील यांनी पर्यावरणपूरक अशा इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्यावर भर दिला आहे. कागदी लगद्यापासून हजारो गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या. या मूर्तींना लंडन, कॅनडा, अमेरिका यासह अनेक देशात प्रचंड मागणी आहे. एक हजारहून अधिक गणेशमूर्ती विदेशात पाठविण्यात आल्या आहेत.
कौस्तुभ पाटील बी. ई. मॅकेनिकल आहेत. त्यांनी पर्यावरणपुरक गणेशमूर्ती तयार करण्याची संकल्पना सहा वर्षापूर्वी मनात आणली. स्वतःमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्या शिक्षणाचा वापर करीत पर्यावरणाचे महत्व यातून पटवून देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. वेगवेगळ्या वृत्तपत्रांपासून त्यांनी गणेशमूर्ती तयार करण्यास सुरुवात केली. दीड फुटापासून पाच फुटांपर्यंतच्या दीड हजारहून अधिक गणेशमूर्ती त्यांच्या मार्फत तयार करण्यात आल्या आहेत. दोन फुटाची एक मूर्ती तयार करण्यासाठी साधारणतः कागद, इतर साहित्यांसह सहा किलो वजनाचे मटेरिअल लागते. एक हजार रुपयांपासून साडेतीन हजार रुपयांपर्यंत किंमत असून मूर्ती तयार करण्यासाठी वर्षाला सुमारे एक टनाहून अधिक वृत्तपत्राची गरज निर्माण होते. दुबई, कॅनडा, लंडन, अमेरिका सारख्या देशांमध्ये या मूर्तींना मागणी अधिक आहे. या व्यवसायातून परिसरातील पंधराहून अधिक महिलांना वर्षभर रोजगाराचे साधन खुले झाले आहे. अनेक महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. वजनाने हलकी व विसर्जनासाठी सोयीस्कर अशा मूर्ती या ठिकाणी तयार होत असल्याने स्थानिक बाजारातदेखील मागणी असल्याचे कौस्तुभ पाटील यांनी सांगितले आहे.