तळा शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

। तळा । वार्ताहर ।
तळा शहरातील मुख्य रस्त्यांवर बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद अवस्थेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तळा शहरात महिला व मुलींची छेडछाड, चेन स्नॅचिंग, पाकीट मार,चोरी यांसारख्या गुन्हेगारीला आळा बसावा तसेच अशा प्रकारच्या घटना घडल्यास गुन्हेगार शोधण्यास पोलिसांना सोपे व्हावे यासाठी तळा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.

हे कॅमेरे शहरातील मल्हार हॉटेल जवळील प्रवेशद्वारावर,मिनिडोअर स्टँड व नगरपंचायत नाका,बळीचा नाका व बँक ऑफ इंडिया समोर,मुळे नाका व महाविद्यालय रस्ता,तसेच चंडिका नाका या ठिकाणी प्रत्येकी दोन असे एकूण दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. यापैकी आठ कॅमेरे हे तळा नगरपंचायत यांच्यामार्फत तर दोन कॅमेरे हे बांधकाम साहित्य विक्रेते अजमल सिंग राठोड यांच्या तर्फे देण्यात आले होते.

मात्र हे सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.त्यामुळे सदर सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी तळा शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version