| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे आता लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. तळा शहरात घडणाऱ्या घटनांवर नजर ठेवण्यासाठी तसेच चोरी, चेन स्नॅचिंग, लूटमार यांसारख्या घटना घडल्यानंतर गुन्हेगारांना पकडणे सोपे व्हावे यासाठी तळा शहरात दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, काही महिन्यांच्या कालावधीनंतर यातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडून केवळ तीन कॅमेरे सुरू होते.
मध्यंतरी भर बाजारपेठेतून बाईकस्वारांनी महिलेचे मंगळसूत्र लांबविले होते. त्यावेळी बाजारपेठेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने अद्यापही चोराला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. यांसह बाजारपेठेत घडलेल्या अनेक गुन्हेगारीच्या घटना केवल सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने उघडकीस आलेल्या नाहीत. याबाबत लोकप्रतिनिधी, नागरिक व पत्रकारांकडून वारंवार सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी करण्यात येत असल्याने मुख्याधिकारी माधुरी मडके यांच्याकडून तळा शहरात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार काही दिवसांतच शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होणार असून, यामुळे शहरातील गुन्हेगारी रोखण्यास मदत होणार आहे.