| माणगाव | प्रतिनिधी |
दहीहंडी उत्सवाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि.26) माणगावातील विवा कॉलेजमध्ये दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देत विवा कॉलेज हे विध्यार्थी व खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश नजरेसमोर ठेऊन विविध उपक्रम सातत्याने राबवित असते. गोविंदाच्या आनंदाला उधाण देण्यासाठी विवा कॉलेजने दहीहंडी उत्सव आयोजित केला होता.
या उत्सवात शहरातील सोनभैरव गोविंदा पथक खांदाड, वाकडाई गोविंदा पथक उतेखोल, जय हनुमान गोविंदा पथक उतेखोलवाडी हे तीन गोविंदा पथक सहभागी झाले होते. या उत्सवात सोनभैरव गोविंदा पथक खांदाड-माणगाव यांनी एकावर एक असे मानवी मनोरे रचत सहा थरांची सलामी दिली. सहाव्या थरावर एका लहान बालकाने जाऊन सलामी दिल्याने उपस्थित मान्यवर, नागरिक व गोविंदानी टाळ्यांच्या गजरात त्याच्या धाडसाचे विशेष कौतुक केले.
या उत्सवाला माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, सुवर्णा जाधव, शर्मिला सत्वे, नथुराम पोवार, काशीराम पोवार, सुमित सूर्यकांत काळे, बाळा मांजरे, सीताराम भोनकर, कृष्णा दिवेकर, गणेश दूरकर, विठोबा पालकर, राकेश पवार, समीर जाधव, रुपेश बोडेरे, वैभव पवार, गणेश भोसले आदी मान्यवरांसह नागरिक व गोविंदा मोठ्या संख्येने उपस्थित होते.