। वावोशी । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील पूर्वीचे महार समाजाचे असणार्या गावठाण भूमीवर 1 जानेवारी रोजी शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भिमा कोरेगाव लढाईतील 500 महार शुरविरांना मानवंदना देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वावोशी ग्रामस्थांनी भीमा कोरेगाव या ठिकाणी न जाता शिरवली येथील महार गावठाण या ठिकाणी जाऊन या शूर महार सैन्यांना मानवंदना देऊन शौर्य दिन साजरा केला. यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना अभिवादन करून उपस्थित असणार्या ग्रामस्थांना या दिवसाचे महत्त्व विषद करण्यात आले. यावेळी वावोशी गावातील रायगड जिल्हा परिषद येथे कार्यरत असणारे प्रशासकीय अधिकारी राजाराम मोरे, ज्येष्ठ नागरिक पांडुरंग मोरे, पुरुषोत्तम मोरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष जतिन मोरे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भालेराव, ईश्वर गायकवाड, राजू भालेराव, रमेश मोरे आदी ग्रामस्थ लहान थोरांसहित उपस्थित होते.






