आर्डे गावाजवळील नाल्यावर सिमेंट बंधारा

दीड किलोमीटरपर्यंत पाणी अडवले

| नेरळ | प्रतिनिधी |

आर्डे गावाच्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारा नाला उन्हाळ्यात कोरडा असतो. मात्र, स्थानिक पातळीवर जनावरे आणि पशु-पक्षी यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी त्या नाल्यातील पाणी सिमेंट बंधारा बांधून अडवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्या बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकण्यात आल्याने साधारण दीड किलोमीटर पर्यंत पाण्याचा साठा झाला आहे.

पाषाणे ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या आर्डे गावाच्या हद्दीत मोठा नाला असून, हा नाला मुरबाड तालुक्यातुन वाहत येतो आणि कर्जत तालुक्यात आल्यावर या नाल्यातील पाणी पोश्री नदीत जाते. मात्र, हा नाला उन्हाळा सुरु झाला कि कोरडा पडतो आणि त्यामुळे नाल्यातील पाणी आटल्याने या भागातील जाणारे तसेच पशु-पक्षी यांच्या पिण्याचे पाण्यासाठी थेट पोश्री नदीमध्ये जावे लागत असते. ते लक्षात घेऊन स्थानिकांनी मागणी केल्यानंतर जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने सिमेंट बंधारा बांधला. त्या सिमेंट बंधाऱ्यात साठणारे पाणी हे स्थानिकासाठी मदतगार ठरत आहे.त्या पाण्याचा वापर या भागातील शेतकरी भाजीपाला करण्यासाठी देखील वापरात असतात आणि त्यामुळे सिमेंट बंधारा शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरत आहे. आर्डे येथील नाल्यात बांधण्यात आलेले सिमेंट बंधाऱ्याला लोखंडी झडपा बसवण्यात आल्या असून त्याचा फायदा या उन्हाळ्यात कोरड्या असलेल्या नाल्यात तुडुंब पाणी साठले आहे.त्या पाण्याची क्षमता साधारण दीड किलोमीटर पर्यंत पोहचली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

Exit mobile version