42 अंश तापमानात शिक्षकांची घरोघरी पायपीट
| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
राज्यभर उष्णतेची तीव्र लाट उसळलेली असताना आणि दुपारच्या कडक उन्हात सामान्य नागरिक घराबाहेर पडणे टाळत असताना, शिक्षक मात्र 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी गावागावांत, वाड्या-वस्त्यांवर आणि डोंगरदऱ्यांत पायपीट करत आहेत. उन्हाच्या झळा, डिहायड्रेशनचा धोका, नागरिकांची उदासीनता आणि प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करत हे शिक्षक जनगणना मोहिमेत अविरतपणे कार्यरत आहेत.
अल-नीनोच्या प्रभावामुळे यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र झाला असून, उष्णतेच्या लाटांचे इशारे सातत्याने दिले जात आहेत. अशा परिस्थितीत शिक्षक डोक्यावर टोपी, हातात मोबाईल व आवश्यक कागदपत्रे घेऊन घराघरांत जाऊन माहिती संकलित करत आहेत. दिवसाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याशिवाय परतायचे नाही, या जिद्दीने ते काम करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

रायगड जिल्ह्यातील दुर्गम भाग, डोंगरदऱ्या आणि आदिवासी वाड्या-पाड्यांमध्ये जनगणनेचे काम करताना शिक्षकांची खरी कसोटी लागत आहे. वाहतुकीची साधने नसलेल्या भागांत अनेक किलोमीटर पायी चालत जावे लागते. तीव्र चढ-उतार आणि उन्हाच्या झळांमुळे शारीरिक थकवा जाणवत असला तरी कर्तव्यभावनेपुढे या अडचणी दुय्यम ठरत आहेत.
जनगणनेदरम्यान शिक्षकांना अनेक कटू अनुभवांनाही सामोरे जावे लागत आहे. अनेक घरे कुलूपबंद असल्याने त्याच परिसरात वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. काही ठिकाणी कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. तर काही नागरिक माहिती देण्यास टाळाटाळ करतात किंवा नकारात्मक प्रतिक्रिया देतात. काहीजण शिक्षकांना विक्री प्रतिनिधी समजून तुच्छतेची वागणूक देतात, तर काही ठिकाणी त्यांना साधे पिण्याचे पाणीही विचारले जात नाही. अशा प्रतिकूल सामाजिक आणि मानसिक वातावरणातही शिक्षक संयम, शिस्त आणि हसतमुखाने आपले काम पार पाडत आहेत. देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जनगणना प्रक्रियेला यशस्वी करण्यासाठी त्यांचे हे योगदान मोलाचे मानले जात आहे.
उन्हात फिरताना शारीरिक त्रास होतो आणि काही लोकांच्या नकारात्मक वागणुकीमुळे मन खिन्नही होते. मात्र, या सर्व अनुभवांच्या पलीकडे जाऊन विचार केला, तर भारत सरकारने आमच्यावर जनगणनेसारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्याची जबाबदारी सोपवली, याचा अभिमान वाटतो. शासनाचा प्रतिनिधी म्हणून ही जबाबदारी पार पाडताना समाधान मिळते.
गोरख आघाव,
प्रगणक, सुधागड







