मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ऐतिहासिक निर्णय!; देशातील ठरले पहिले राज्य असोसिएशन
| मुंबई | प्रतिनिधी |
आयपीएलच्या 19 व्या हंगामाचा थरार सध्या शिगेला पोहोचला आहे. अनेक युवा खेळाडू या व्यासपीठावर आपली चमक दाखवत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस हा हंगाम संपल्यानंतर भारतीय संघाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक सुरू होईल. मात्र, भारतीय संघात आणि आयपीएलमध्ये स्थान मिळवणे हे मोजक्याच खेळाडूंना शक्य होते. अशा स्थितीत, ज्या खेळाडूंना या दोन्ही मोठ्या व्यासपीठांवर संधी मिळत नाही, त्यांच्या उपजीविकेचे आणि कमाईचे काय? या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने एका ऐतिहासिक निर्णयाद्वारे दिले आहे.
देशातील सर्वात यशस्वी क्रिकेट संघटना असलेल्या एमसीएने आपल्या खेळाडूंसाठी वार्षिक कंत्राट देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आगामी 2026-27 या हंगामापासून या प्रणालीची अंमलबजावणी सुरू होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या धर्तीवरच एमसीए आपल्या खेळाडूंना 3 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागणार असून, त्यानुसार त्यांना ठराविक वार्षिक रक्कम दिली जाणार आहे.
एमसीएच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मात्र, हे कंत्राट सर्वच खेळाडूंना मिळणार नाही. यासाठी काही विशेष निकष लावण्यात आले आहेत. खेळाडू एमसीएचा नोंदणीकृत खेळाडू असणे अनिवार्य आहे. जे खेळाडू सलग 2 हंगामांपासून भारतीय संघात निवडले गेलेले नाहीत किंवा ज्यांना सलग 2 आयपीएल लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतलेले नाही, अशाच खेळाडूंना या कंत्राटाचा लाभ मिळेल. ज्या खेळाडूंना आयपीएल किंवा टीम इंडियाकडून उत्पन्न मिळत नाही, त्यांना आर्थिक स्थैर्य देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. निवड समितीची शिफारस आणि एमसीएने ठरवून दिलेले फिटनेसचे कडक निकष पूर्ण करणाऱ्या खेळाडूंनाच या यादीत स्थान मिळेल.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले, हा उपक्रम मुंबई क्रिकेटसाठी एका नव्या युगाची सुरुवात आहे. आपल्या खेळाडूंसाठी करार पद्धती लागू करणारी पहिली संघटना ठरल्याचा आम्हाला अभिमान आहे. हे एक पुरोगामी पाऊल आहे, जे आमच्या मुंबईच्या खेळाडूंना अधिक सुरक्षा, सुसूत्रता आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देईल. हे पाऊल मुंबई क्रिकेटचा पाया मजबूत करण्याच्या आणि क्रिकेटपटूंच्या पुढील पिढीला सक्षम करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने पुढे म्हटले, हा उपक्रम उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आर्थिक सुरक्षा, व्यावसायिक कार्यचौकट आणि दीर्घकालीन विकासाचे मार्ग उपलब्ध करून देत एका नव्या युगाची नांदी ठरतो. ही प्रणाली अशा खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी तयार करण्यात आली आहे, जे उच्च सन्मान किंवा यशाच्या उंबरठ्यावर उभे आहेत; ज्यामुळे त्यांना देशांतर्गत स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी करण्यासाठी आवश्यक ते स्थैर्य आणि प्रेरणा मिळेल.
वार्षिक मानधनाचे स्वरूप आणि श्रेणी"
ग्रेड : या श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 12 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत
मानधन मिळेल.
ग्रेड : या खेळाडूंना वर्षाला 8 लाख ते 12 लाख रुपये दिले जातील.
ग्रेड : या श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 8 लाख रुपये निश्चित मानधन मिळेल.
हे वार्षिक कंत्राट खेळाडूंना मिळणाऱ्या ‘मॅच फी'पेक्षा वेगळे असेल. म्हणजेच रणजी ट्रॉफी, विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी यांसारख्या स्पर्धा खेळल्यानंतर मिळणारे सामन्याचे मानधन खेळाडूंना स्वतंत्रपणे मिळत राहील. अशा प्रकारे स्थानिक खेळाडूंसाठी वार्षिक कंत्राट पद्धत लागू करणारी मुंबई क्रिकेट असोसिएशन ही देशातील पहिलीच राज्य संघटना ठरली आहे. या निर्णयामुळे मुंबईच्या क्रिकेटपटूंना केवळ आर्थिक सुरक्षाच मिळणार नाही, तर त्यांच्या कामगिरीत अधिक सातत्य आणि व्यावसायिकता येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
