| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील पहिले सीइटी अभ्यासकेंद्र कापडे बुद्रुक येथील श्रीवरदायिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून लवकरच कापडे विद्यालयाला आयएसओ मानांकनासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती अजय सलागरे यांनी येथे दिली.
श्रीवरदायिनी विद्यालयात बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय तसेच अन्य क्षेत्रातील प्रवेशासाठी सीईटी अभ्यासकेंद्र सुरू करण्यासाठी पुणे येथील गणितज्ज्ञ आशिष आगाशे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याथीर-पालक विचारविनीमय सभा प्राचार्य दशरथ पार्टे, माजी मुख्याध्यापक हिंदूराव माळी, सेवानिवृत्त नायब तहसिलदार सुभाष जगदाळे, शाळा समिती सदस्य अजय सलागरे, रामदास सकपाळ, रविकांत सकपाळ तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. यावेळी अजय सलागरे यांनी ही माहिती दिली.
याप्रसंगी हिंदूराव माळी यांनी कापडे बुद्रुक येथील श्रीवरदायिनी माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी अजय सलागरे व रामदास सकपाळ आणि जाधव यांची शाळा समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. यावेळी मार्गदर्शक गणितज्ज्ञ आशिष आगाशे यांनी मार्गदर्शन केले.या सहविचार सभेवेळी साखर येथील अपंग पालक गणेश मालुसरे यांनी, पुणे येथे 45 दिवसांच्या सीइटी अभ्यासक्रमासाठी 60 ते 75 हजार रूपयांची मागणी केली गेली असताना कोणतीही पूर्वतयारी नसल्याने आपल्या पाल्यास प्रवेश न घेताच परिक्षेला अनुभवासाठी सामोरे जाण्यास सांगितले. मात्र, तोच अभ्यासक्रम पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात उपलब्ध होणार असल्याने पालकांनी आता काही करून अवश्य पाल्यांना या अभ्यासकेंद्रामध्ये पाठवावे असे आवाहन केले. यावेळी अन्य पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी मते मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविकांत मोरे यांनी केले तर सुभाष जगदाळे यांनी आभार मानले.







