शेतकर्‍यांचे साखळी उपोषण स्थगित

। गडब । वार्ताहर ।

पेण तालुक्यातील बुर्डीखार येथील शेतकर्‍यांनी आपल्या विविध मांगण्यासाठी करंजेटेप येथील हनुमान मंदीरात साखळी उपोषण केले होते. यावेळी पेण तहसीलदार तानाजी शेजल यांनी शेतकर्‍यांना आश्वासन दिल्यावर शेतकर्‍यांनी उपोषण स्थगित केले आहे.

कासू गडब विभागातील सर्व नागरिकांना मोफत शुद्ध पाणी मिळावे. पनवेल ते इंदापूरच्या रस्ता रुंदिकरणाच्या कामात येथील शेतकर्‍यांच्या शेती लगत केलेल्या भरावामुळे, शेतीचे पाणी व सांडपाणी जाण्याचा मार्ग बंद झाला असल्याने नुकसान भरपाई मिळावी व भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी पक्का नाला बांधुन मिळावा. केमिकलयुक्त खराब पाणी शेतजमिनीमध्ये पसरल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. ते संपूर्ण भराव काढेपर्यंतचे नुकसान भरून मिळावे. तसेच, शेतीमध्ये काम करायला जाताना या पाण्यामुळे ऍलर्जी होत असल्यामुळे यावर उपाययोजना करावी व संबंधितांवर कार्यवाही करावी, आदी मागण्यांसाठी हे साखळी उपोषण केले होते.

या उपोषणकर्त्यांची पेण तहसिलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, वडखळ पोलीस निरिक्षक प्रसाद पांढरे निरगुडे, मंडळ अधिकारी निरगुडे यांनी उपोषणकर्त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. तसेच, या संदर्भात संबंधित अधिकारी, वरिष्ठ शासकीय अधिकारी व शेतकरी यांच्या समवेत एकत्रित बैठक आयोजित करुन तोडगा काढू, असे पत्र देऊन आश्‍वासित केले आहे. यानंतर उपोषणकर्त्यांनी एकमताने आपले उपोषण तूर्तास स्थगित केले आहे. यावेळी चैतन्य पाटील, हेमंत पाटील, नंदा म्हात्रे, जनार्दन नाईक, सुरेंद्र पवार, डॉ. इरफान अंतुले, मधुकर पाटील, जयराम तांडेल, कमलाकर पाटील, भगवान जांभळे, पांडुरंग तांडेल, हरिश्‍चंद्र तांडेल, मनोज भगत, हिरामण तांडेल आदि शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version