। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील शहर क्षेत्रातील चार आदिवासी सहकार सेवा संस्था यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. कळंब, पोशीर, वारे आणि खांडस या चारही सहकारी सेवा संस्थांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे संचालक अध्यक्ष पदावर विराजमान झाले आहेत.
सहकार क्षेत्रातील विविध विकास कार्यकारी सेवा संस्था यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका पार पडल्या. कळंब, वारे, पोशीर आणि खांडस या चार आदिवासी सेवा संस्थांवर अध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे संचालक हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर वारे आणि पोशीर या सोसायटीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे तर खांडस आणि कळंब या सोसायटीमध्ये शिवसेनेचे उपाध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत. सर्व आदिवासी सेवा संस्था यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व असून सहकार क्षेत्रात निवडणुका नको म्हणून हि निवडणूक बिनविरोध पार पडली.
पोशीर आदिवासी विविध विकास कार्यकारी सोसायटीवर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यासाठी पीठासीन अधिकारी ए.ए.मदने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जनार्दन मुकणे यांनी तर उपाध्यक्ष म्हणून शेकापचे प्रकाश फराट यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यामुळे एकमेव अर्ज दाखल झाल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची नाव निवडणूक बिनविरोध झाली. वारे आदिवासी विविध विकास कार्यकारी सोसायटीमध्ये पीठासीन अधिकारी दिलीप सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली झालल्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी शेतकरी कामगार पक्षाचे चाहु जैतू केवारी यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी शेकापचे शिवाजी अनंत देशमुख यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. दोन्ही जागांसाठी एक एमव्ही अर्ज दाखल झाल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड झाली.
तालुक्यातील खांडस आदिवासी विविध विकास कार्यकारी सोसायटीमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यासाठी पीठासीन अधिकारी प्रदीप घुसले यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी अध्यक्ष पदासाठी शेतकरी कामगार पक्षाचे किसन वारघडे यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे कैलाश जगताप यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाल्याने हि निवडणूक बिनविरोध झाली. कळंब आदिवासी विविध विकास सेवा संस्था या सोसायटीमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी अध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे संचालक माजी सरपंच दादा पादीर यांची तर उपाध्यक्ष म्हणून शिवसेनेचे नारायण लक्ष्मण बदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पोशीर, कळंब, वारे आणि खांडस या आदिवासी सहकारी सोसायटीमध्ये नवनिर्वाचित झालेले अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे प्रभारी तालुका चिटणीस श्रीराम राणे, रायगड जिल्हा परिषद सदस्य नारायण डामसे, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे मावळते अध्यक्ष गजानन पेमारे, कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती यशवन्त जाधव, शेकाप अल्पसंख्याक सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष बबन भालेराव, माजी सरपंच रवींद झांजे, शेकापचे विभागीय चिटणीस पांडुरंग बडे, शेकाप पुरोगामी सेलचे महेश म्हसे आदी उपस्थित होते.