। अलिबाग । प्रतिनिधी ।
सखी सेवा संस्था व ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने भाऊसाहेब लेले चौक येथे रविवारी (दि.3) दुपारी 4.30 ते संध्याकाळी 6.30 या दरम्यान जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने भूली यादें या कार्यक्रमांतर्गत सुचेता बापट व सहकारी, पुणे यांचे पथनाट्य व शंका समाधान केले जाणार आहे. याच कार्यक्रमात ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ. अनिल डोंगरे यांचेही मार्गदर्शन होणार आहे.
गेल्या काही वर्षात माणसाची प्रगती झाली, पण त्याचबरोबर त्याला वेगवेगळ्या नवनवीन आजारांना तोंड द्यावे लागत आहे. काही आजार थेट शारिरीक व्याधींच्या स्वरूपात घाला घालतात तर काही छुप्या पद्धतीने नुकसान करतात. विस्मरण (अल्झायमर) हा असाच एक छुपा आजार आहे. या विस्मरणाने जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या वर्तन समस्या वाढतात, त्याचा त्या व्यक्तीला, कुटूंबातील सदस्यांना त्रास होऊ लागतो तेव्हा हा देखील एक गंभीर आजार आहे हे लक्षात येते. या आजाराची लक्षणे, समस्या जाणून घेणे यासाठी भूली यादें या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.