भारतीय हॉकी संघासमोर ऑलिंपिक पात्रतेचे आव्हान

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय पुरुष हॉकी संघासमोर पॅरिस ऑलिंपिकमध्ये पात्र ठरण्याचे आव्हान असणार आहे. चीनमधील हांगझाऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकले नाही, तर त्यांना पात्रता फेरीत खेळण्यासाठी स्पेन किंवा पाकिस्तानात जावे लागणार आहे. पात्रता फेरीच्या लढती पुढल्या वर्षी 13 ते 21 जानेवारी या कालावधीत खेळवण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेकडून पॅरिस ऑलिंपिक पात्रता फेरीची घोषणा करण्यात आली.

पुरुष गटाची पात्रता फेरी स्पेन व पाकिस्तान या दोन देशांमध्ये होणार आहे. स्पेनमधील वॅलेंसिया व पाकिस्तानातील लाहोर येथे पात्रता फेरीच्या लढती रंगणार आहेत. चीनमधील हांगझाऊ येथे 23 सप्टेंबरपासून आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतीय पुरुष संघाने या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवल्यास त्यांना पॅरिस ऑलिंपिकमध्ये थेट प्रवेश करता येणार आहे. मात्र सुवर्णपदकाने हुलकावणी दिल्यास भारतीय पुरुष संघाला स्पेन किंवा पाकिस्तानात पात्रता फेरीसाठी जावे लागणार आहे. पॅरिस ऑलिंपिकसाठी असे ठरणार 12 देश पात्र पॅरिस ऑलिंपिकसाठी हॉकी या खेळातील पुरुष गटात 12 देश पात्र ठरणार आहेत. यजमान देश म्हणून फ्रान्सला थेट प्रवेश देण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येक खंडातील स्पर्धांमधून विजयी होणारा देशही पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरणार आहे.

Exit mobile version