वडाळ्यातील पटांगणावर आयोजन; शिवशक्ती, स्वामी समर्थ मंडळाची बाजी
| मुंबई | क्रीडा प्रतिनिधी |
मुंबई शहर (पूर्व व पश्चिम विभाग) कबड्डी असो.ने द्रौपदी मारूती जाधव चषक जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. हे सामने वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर पार पडले. या स्पर्धेत कुमारी गटात शिवशक्ती महिला संघ आणि श्री स्वामी समर्थ मंडळाने बाजी मारली आहे. तर, किशोर गटात गुड मॉर्निग स्पोर्ट्स आणि विजय क्लब यांनी जेतेपद पटाकवले आहे.
या स्पर्धेत पश्चिम विभागातील कुमारी गटाच्या अंतिम सामन्यात शिवशक्ती महिला संघ-अ ने अमरहिंद मंडळाला 55-23 असे पराभूत करीत स्व. सौ. द्रौपदी मारूती जाधव चषक पटकविण्यात सातत्य राखले. त्यांनी आक्रमक सुरुवात करीत शिवशक्तीने पूर्वार्धात 24-12 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात आपला खेळ अधिक गतिमान करीत गुणांचे अर्धशतक पार करीत आपला विजय सोपा केला. समृद्धी भगत, जयश्री शिंगाडे यांच्या चौफेर चढाया त्यांना सिद्धी थोरवेची मिळालेली पकडीची साथ यामुळे हे शक्य झाले. अमरहिंदच्या सलोनी नाक्ती, मानसी रेडेकर यांचा या सामन्यात प्रभाव पडला नाही. कुमारी गटाच्या पूर्व विभागातील अंतिम सामन्यात श्री स्वामी समर्थ मंडळाने शताब्दी स्पोर्ट्स ‘ब’ चा प्रतिकार 23-20 असा परतवून लावत स्व. दौपदी मारूती जाधव चषक पटकविला. विश्रांतीला आक्रमक सुरुवात करीत स्वामी समर्थने पहिल्या डावात 18-09 अशी भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर आहे ती आघाडी टिकविण्यावर भर देत सावध खेळ करीत सामना 3 गुणांच्या फरकाने आपल्या नावे केला. आर्या रावल, कावेरी सावंत, सई शिंदे यांच्या चतुरस्त्र खेळाला याचे श्रेय जाते. नंदिनी मौर्या, अन्नू यादव यांचा उत्तरार्धातील खेळ संघाचा पराभव टाळण्यात कमी पडला.
पूर्व विभागात किशोरांच्या अंतिम सामन्यात गुड मॉर्निंगने शिवमुद्रा प्रतिष्ठानचा 53-37 असा पराभव करीत जेतेपदाला गवसणी घातली. कुमार गटानंतर त्यांचे हे दुसरे जेतेपद ठरले. निखिल राठोड, अंश पंढरे, मयूर सावंत यांच्या सर्वांगसुंदर खेळाला या मोठ्या विजयाचे श्रेय जाते. शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अमन खांडेकर, रोहन कांबळे बरे खेळले. पश्चिम विभागातील किशोरांच्या अंतिम सामन्यात विजय क्लबने गोलफादेवी सेवा संघाला 55-30 असे सहज नमवीत विजेते पद मिळवले. कुमार गटात उपविजेते पदावर समाधान मानावे लागलेल्या विजय क्लबने किशोर गटाचे जेतेपद पटकवीत दुःख हलके केले. जयकिसन चव्हाण, आयुष यादव यांच्या झंझावाती खेळाला याचे सारे श्रेय जाते. गौरव जैसावाल, जेदर गुड्डेटी यांचा खेळ बरा होता. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कबड्डीप्रेमी आमदार महेश सावंत, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जेष्ठ संघटक जया शेट्टी, शिवछत्रपती पुरस्कार प्रात जेष्ठ महिला खेळाडू छाया शेट्टी(बांदोडकर) आदी मान्यवाराच्या उपस्थितीत पार पडला.
