सिग्नल पार करताना खड्ड्यांचा अडथळा

| पनवेल | वार्ताहर |

खारघरमधील शीघ्र कृती दलासमोरील सिग्नल यंत्रणा पार करण्यासाठी तीस सेकंदचा वेळ आहे. त्यात सिग्नलजवळ असलेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे सिग्नल यंत्रणा पार करताना अडथळा होत असून, पनवेल महापालिकेने धोकादायक खड्डा बुजवून वाहतूक कोंडीची समस्या दूर करावी, अशी मागणी तळोजामधील नागरिकांकडून केली जात आहे.

पनवेल-शिळफाटा मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. तळोजा वसाहतीत प्रवेश करताना आणि बाहेर पडताना चारही बाजूला वाहतूक कोंडी होत असल्यामुळे तळोजा वाहतूक पोलिसांनी शीघ्र कृती दलासमोरील चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. दरम्यान, तळोजा वसाहतीमधून बाहेर पडताना पनवेल, मुंब्रा आणि खारघर तसेच शिळफाटाकडे जाताना सिग्नल यंत्रणा लगत असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यात सिग्नल पार करण्यासाठी केवळ तीस सेकंदच वेळ आहे. सिग्नल लगत रस्त्यावर पडलेल्या खड्डयात वाहने अडकण्याची भीती असल्यामुळे मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डयामुळे सिग्नल ओलांडताना खड्डयात पडून अपघात होण्याची शक्यता असून, पनवेल महापालिकेने अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी तळोजामधील रहिवाशी करीत आहेत.

Exit mobile version