। उरण । वार्ताहर ।
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी व मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. प्रमुख राजकीय पक्ष विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही इच्छुकांची भाऊगर्दीही वाढू लागली आहे. यातूनच आपण केलेल्या कामांचे दाखले इच्छुक बॅनरबाजीतून देत आहेत.
तालुक्यात समाजमाध्यमांमधूनही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. अशावेळी स्वपक्षात संधी न मिळाल्यास प्लान बी म्हणून समविचारी व इतर पक्षात सीमोल्लंघन करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यामुळे येत्या काळात फोडाफोडीच्या राजकारणाला अधिक बळ मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात अपेक्षित यश आले नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणतीही चूक होऊ नये यासाठी राजकीय पक्षांकडून नियोजन सुरू केले आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतदेखील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगणार आहे. असे असले तरी यंदाच्या निवडणुकीत आपल्याला संधी मिळावी यासाठी इच्छुकांनी आपल्या पक्ष नेतृत्वाकडे साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. जर, विद्यमान आमदारांना डावलून दुसर्या उमेदवाराला संधी दिल्यास बंडाचे निशाण उगारण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर संधी न मिळालेले इच्छुक सीमोल्लंघन करण्याची शक्यता आहे.