5G च्या नावाखाली फसवणुकीची शक्यता

रायगड पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

5G सिमकार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली असामाजिक तत्त्वांकडून फसवणूक होण्याची शक्यता असून, कोणासही ओटीपी/पासवर्ड तसेच बँकिंगसंदर्भातील माहिती शेअर करू नये, असे आवाहन रायगड जिल्ह्यातील नागरिकांना रायगड पोलिसांनी केले आहे.

यासदर्भात रायगड पोलिसांच्या वतीने एक पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे. त्यानुसार म्हटले आहे की, तुमच्या मोबाईलमध्ये 5G सिमकार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली माहिती मागवून आपले बँक अकाऊंट, मोबाईलमधील डेटा हॅक करून काही असामाजिक तत्त्वे सामान्य माणसाची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता नागरिकांनी अशा कोणत्याही फसवणुकीला बळी न पडण्याचे आवाहन सायबर क्राईम पोलीस ठाणे, रायगडमार्फत करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. कोणत्याही अनोळखी हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू नये. कोणतेही अनोळखी अ‍ॅप्लीकेशन डाउनलोड करू नये. बँकिंगसंदर्भातील कोणतेही ओटीपी अथवा पासवर्ड शेअर करू नये, अशा सूचनादेखील पोलिसांनी दिल्या आहेत.

Exit mobile version