अलिबाग गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 35 जणांवर गुन्हा दाखल
| चणेरा | प्रतिनिधी |
मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन गेमिंगद्वारे जुगार खेळणाऱ्या टोळीवर अलिबाग स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने मोठी आणि नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 35 जणांवर गुन्हा दाखल केला असून, एक मोबाईल फोन आणि 3 हजार 180 रोख रक्कम असा एकूण 18 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे व पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहा-अष्टमी मार्गावरील योगेश्वरी रसवंतीगृहाजवळ आडोशाला संभे येथील नितेश सानप याचा इतरांकडून ऑनलाईन पैसे स्वीकारून फनगेम आणि फनरेप या मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली जुगाराचा गोरस धंदा सुरू होता, अशी माहिती रायगड स्थानीक गुन्हे अन्वेशण शाखेचे मोरेश्वर उमले यांना मिळाली होती. त्यांच्या पथकाने तातडीने कारवाई केली आणि रोहा तालुक्यातील विविध ठिकाणी छापे टाकून जुगाराचा मोठा प्रकार उघडकीस आणला. दरम्यान, नितेश सानपकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याचा मोबाईलमधील फेअरडील या व्हॉट्सॲप ग्रुपमधील 33 सदस्य देखील ऑनलाइन जुगार चालवीत असल्याचे निदर्षनास आले. त्यामुळे या जुगार प्रकरणात नितेश सानप सह शिल्पेश पोवाळे (अलिबाग), शिवाजी पवार (रोहा) असे एकूण 35 आरोपी या ऑनलाइन जुगार नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल व रोख रक्कम रुपये 3 हजार 180 असा एकूण 18 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींनी मोबाईल अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेऊन जुगार खेळवला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील हे करीत आहेत.
तपासात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत स्थानीक गुन्हे शाखा अलिबाग येथील पोलीस अधिकाऱ्यांनी उत्तम समन्वय व परिश्रमाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यात रविंद्र मुंढे, मोरेश्वर ओमले, संदीप पहलेकर, लालासो वाघमोडे, बाबासो पिंगळे व ओमकार सोंडकर यांचा सहभाग आहे. या सर्व पोलिसांनी धाडसी पद्धतीने छापे टाकून आरोपींना पकडण्यात आणि पुरावे गोळा करण्यात मोलाचे योगदान दिले. रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही कारवाई जिल्ह्यात वाढत्या ऑनलाइन जुगार प्रकरणांवर प्रभावी नियंत्रण ठेवणारी ठरली आहे.
बेकायदेशीर कृत्यांवर 'रायगड दृष्टी'
रायगड पोलिसांनी नागरिकांना गुन्हेगारी आणि बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नागरिकांना थेट पोलिसांशी संवाद साधता यावा म्हणून 'रायगड दृष्टी' व्हॉट्सअॅप चॅटबॉट ही नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे. रायगड ड्यूटी व्हॉट्सअॅप चॅटबॉट क्रमांक 9620032323 हा असून या चॅनेलद्वारे नागरिक आपल्या परिसरातील मटका, जुगार, अंमली पदार्थ, अवैध दारू व्यापार किंवा अन्य बेकायदेशीर कृत्यांविषयीची माहिती थेट पोलिसांना देऊ शकतात. नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.







