मिनिट्रेनच्या फेर्‍यांमध्ये बदल

तसेच गाड्यांच्या फेर्‍यात वाढविण्याची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये येणार्‍या प्रत्येक पर्यटकाची लाडकी समजली जाणारी मिनीट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ अशी सेवा सुरु झाल्यापासून पर्यटक प्रवाशांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नेरळ येथून जाणार्‍या मिनीट्रेनच्या फेर्‍यांत बदल करण्यात आले आहेत. तर, पर्यटकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन प्रवासी गाडीच्या फेर्‍यांमध्ये वाढ करण्याची मागणी होऊ लागली आहे.

मे 2019 मध्ये मिनीट्रेनला सलग दोनदा अपघात झाले आणि त्यानंतर बंद पडलेली नेरळ-माथेरान-नेरळ अशी सेवा 22 ऑक्टोबर 2022 रोजी पुन्हा सुरु झाली आहे. त्यावेळी नेरळ येथून दोन आणि माथेरानमध्ये दोन अशा फेर्‍या नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर प्रवासी वाहतूक सुरु झाली होती. त्यावेळी नेरळ येथून सकाळी आठ वाजून 50 मिनिटांनी पहिली गाडी माथेरानसाठी रवाना होत होती आणि नंतर दुपारी दोन वाजून 20 मिनिटांनी गाडी माथेरानसाठी सोडली जायची. दीड महिने त्याप्रमाणे वेळापत्रकनुसार मिनीट्रेन चालविली जात होती. मात्र, आता मिनीट्रेनच्या फेरीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

दरम्यान, नेरळ-माथेरान-नेरळ अशी दुपारी दोन वाजून 20 मिनिटे यावेळी सोडली जाणारी मिनीट्रेन दुपारऐवजी सकाळी दहा वाजून 25 मिनिटे या नवीन वेळापत्रकानुसार सुरु करण्यात आली आहे. त्यावेळी माथेरान येथून नेरळसाठी सोडल्या जाणार्‍या गाड्यांची वेळदेखील बदलली आहे. आता नवीन वेळापत्रकानुसार दुपारी दोन वाजून 45 मिनिटे आणि दुपारी चार वाजता अशा वेळात या मिनीट्रेन माथेरान येथून नेरळकरिता रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, माथेरानची मिनीट्रेन आणि माथेरानचे पर्यटन असे समीकरण अनेक वर्षांपासून आहे. ते लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने नेरळ माथेरान नेरळ मार्गावर आणखी दोन फेर्‍या मिनीट्रेनच्या सुरु करण्यात याव्यात आणि त्यात नेरळ येथून सायंकाळी पाच वाजता वस्तीची गाडी सुरु करण्यात यावी, अशी मागणी माथेरानमधील स्थानिक करू लागले आहेत.
वेळापत्रक
नेरळ माथेरान नेरळ सकाळी 8.10, 10.25
माथेरान नेरळ माथेरान दुपारी 02.45,04.00

Exit mobile version