। माथेरान । वार्ताहर ।
नेरळ -माथेरान मिनी ट्रेन लवकरच सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे. नेरळ- माथेरान रेल्वे मार्गावर सुरु असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांनी रेल्वेची पाहणी केली. तसेच माथेरान स्थानकाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
राष्ट्रवादीचे सरचिटणीस अजय सावंत यांनी त्यावेळी लाहोटी यांची भेट घेऊन ट्रेन लवकर सुरू व्हावी, तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या शटल सेवेच्या बोगींमध्ये वाढ करावी, अशी मागणी लेखी निवेदनद्वारे केली. त्याची दखल घेत लाहोटी यांनी लवकरच दोन बोग्यांमध्ये वाढ करून पर्यटन वाहण्याची क्षमता वाढवली जाईल, अशी ग्वाही दिली. सध्या माथेरानमध्ये वाढीव बोगी उपलब्ध नसल्याने नेरळ येथून दोन नवीन बोगी आणून ही सेवा सुरू करण्यात येईल असे सांगितले.
माथेरानमध्ये होणार्या पावसाचा फटका मिनी ट्रेनला दरवर्षी बसतो. त्यातच येथे दोन-तीन वेळा इंजिन घसरण्याचे प्रमाण झाल्याने या मार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला होता. 2019 ला झालेल्या अतिवृष्टीनंतर या मार्गाची पुन्हा एकदा पाहणी करण्यात आली व सुरक्षितेच्या कारणासाठी या मार्गावरील सर्व रुळ बदलण्याचे यावेळी ठरले. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार रेल्वे स्लीपर बदलण्याचे काम सुरू झाले होते. हे काम आता जुम्मापट्टी या स्थानकापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या कामाची पाहणी करण्याकरिता लाहोटी व विभागीय प्रबंधक सलग गोयल यांनी माथेरानला भेट दिली.
नोव्हेंबरपर्यंत नेरळ-माथेरान मिनीट्रेन सुरू करण्याचा प्रयत्न राहील. अमन लॉज ते माथेरान शटल सेवेच्या फेर्यांमध्ये दोन जादा बोगी जोडण्यात येतील.
अनिलकुमार लाहोटी, महाप्रबंधक, मध्य रेल्वे