| पनवेल | वार्ताहर |
वेळोवेळी नवीन मटास्क देऊन त्यात रक्कम गुंतवण्यास सांगून पाच टास्क करता एकूण 11 लाख 20 हजारांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
योगेंद्र कुशवाह हे खारघर, सेक्टर-19 येथे राहत असून एका कंपनीत मॅनेजर आहेत. त्यांना व्हॉट्सॲपवर आदिती उपाध्याय यांनी गुगल रेटिंग प्रमोशन करण्याबाबत पार्ट टाइम जॉबची माहिती दिली. तिच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी रिव्ह्यू दिले. त्याचा व्हॉट्सॲपवर स्क्रीन शॉट पाठवला असता 203 रुपये कमिशन पाठवणार असल्याचे सांगून बँक खाते मागितले. त्यानंतर 203 रुपये जमा झाले. त्यांना टेलिग्राम ग्रुपवर जॉइन करून घेतले. हॉटेलबाबतचे रिव्ह्यू आले होते. त्याला फाइव्ह स्टार रेटिंग दिले असता दुसरा इकॉनॉमिक टास्क दिला, तर त्यांनी तो केला नाही. त्यानंतर काही वेळात त्यांना रिव्ह्यू आले. त्यानंतर एक हजार रुपये पाठवले. रिव्ह्यू केले असता खात्यावर कमिशनसह पंधराशे रुपये जमा झाले. त्यानंतर टेलिग्रामवरील नवीन ग्रुपला त्यांना जॉइन केले. नंतर पाच हजार रुपये भरण्यास सांगितले. ती रक्कम त्यांनी भरली. त्यानंतर सव्वालाख रुपयांचा तिसरा टास्क आला. यावेळी हा टास्क करावा लागेल, मगच सर्व रक्कम मिळण्याचे आमिष दाखवले.