मतांसाठी आमदारांचा खोटारडेपणा; चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताईंचा हल्लाबोल
| रोहा | वार्ताहर |
चणेरा भागात कारखाने आणू, आरसीएफ आणू, अशी फसवी आश्वासनं देऊन मागाील निवडणुकीत मतं मिळवलीत. तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून त्यांचे बायोडाटा गोळा केलेत. मात्र, पाच वर्षांत या भागात एकही कारखाना आला नाही. येथील जनतेच्या भावनांशी तुम्ही खेळला आहात. आपण केलेली फसवणूक आता जनतेच्या निदर्शनास आली आहे. केवळ मतांचा जोगावा आपल्या झोळीत पाडून घेण्यासाठी तुम्ही खोटे बोलला आहात. तुम्हाचा खोटारडेपणा येथील जनता उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांनी आ. दळवींना दिला आहे.
चणेरा भागात सोमवारी (दि.11) रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांनी कॉर्नर सभा घेत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आ. महेंद्र दळवी यांची पोलखोल करत जोरदार हल्ला केला. यावेळी व्यासपीठावर आरडीसी बँकेचे संचालक गणेश मढवी, अनिल साळावकर, गोपीनाथ गंभे, संदेश विचारे, मनोज भायतांडेल, अनिल माळी, शरद गंभे, हेमंत ठाकूर, अशोक कांबळे, अनिल वर्तक, राजेंद्र मळेकर, सरपंच गणेश भगत, राजेंद्र जंगम आदी मान्यवरांसह असंख्य नागरिक उपस्थित होते.
चित्रलेखा पाटील पुढे म्हणाल्या की, चणेरा भागात कारखाने आणू, या भागात आरसीएफ आणू, काही ठिकाणी सूटबूट आणि टाय लावलेल्या व्यक्तींना पाठवून ते आरसीएफ कंपनीचे अधिकारी आहेत असे भासवून तरुणांना नोकरीची हमी दिली. तरुणांच्या हाताला रोजगार देऊ असं सांगत त्यांच्याकडून बायोडाटा गोळा केलेत. आपल्या भागात कारखानदारी येणार म्हणून येथील लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र, पाच वर्षांत या भागात एकही कारखाना आला नाही. या भागातील सर्व समस्या आणि प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. विधानसभेत त्यांनी आपल्या भागातील एकही प्रश्न उपस्थित केला नाही. उलटपक्षी, सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून गोळा केलेल्या बायोडाटा पेपरची रद्दी काल-परवा थळ गावातीला एका रद्दीवाल्याने अलिबागला येऊन विकली. केवळ मतांसाठी तुम्ही तरुणांची फसवणूक करून त्यांच्या भावनांशी खेळलात. नोकरी लावायची नव्हती, रोजगार द्यायचं नव्हतं, तर निदान खोटं तरी बोलायचं नव्हतं. आता लोकांना कळून चुकलं आहे. लोकं एकदा फसली, परत-परत फसणार नाही. असं सांगत चणेरा भागात कारखानदारी आणू असे खोटे आश्वासन देणार्यांनी मागील पाच वर्षांत किती तरुणांच्या हाताला रोजगार दिला का, असा रोकडा सवाल चित्रालेखा पाटील यांनी आ. महेंद्र दळवी यांना केला आहे.
ताईंची छकड्यातून मिरवणूक चणेरा भागात प्रचारदरम्यान बाजार पेठेतून चिऊताई पाटील यांची छकड्यातून भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. चिऊताईंनी सर्व मतदारांना अभिवादन करत आशीर्वाद मागितले.आपली लेक, आपली सूनबाई समजून चणेरावासियांनी ताईंचे जंगी स्वागत केले. दरम्यान, शिट्टी बजाव, गद्दार भगाव, ऐंशी टक्के नव्वद टक्के, चिऊताई शंबर टक्के, चिऊताई आगे बडो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा आणि शिट्टीच्या आवाजाने परिसर दुमदूमला होता.