रेल्वेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक

14 जणांकडून एक कोटी 22 लाखांची लूट

| नेरळ | प्रतिनिधी |

मध्य रेल्वेमध्ये नोकरीला लावतो म्हणून नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वेमध्ये नोकरीला असलेल्या चार तरुणांनी परिसरातील 14 तरुणांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्या सर्व 14 तरुणांना विविध पदांवर नोकरीला लावण्यासाठी तब्बल एक कोटी 22 लाख 50 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे.

नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील चार रेल्वे कर्मचारी यांनी मध्य रेल्वे मध्ये खलाशी, टीसी, शिपाई आदी पदांवर नोकरी लावतो असे आमिष दाखवले. मात्र, चार वर्षांत नोकरी लागली नसल्याने त्या तरुणांनी नेरळ पोलीस ठाण्यात येऊन आपली तक्रार दाखल केली. प्रत्येक तरुणाकडून साधारण साडे सोळा लाख रुपये मध्य रेल्वेमध्ये नोकरीला असलेल्या त्या चार तरुणांनी घेतले आहेत. या चार ठकसेनांनी 14 तरुणांकडून आतापर्यंत 1 कोटी 22 लाख 50 हजार रुपये घेऊन सर्वांना वाराणसी येथे नेऊन बोगस मेडिकल टेस्ट घेतली आणि बनावट जॉयनिंग लेटर देऊन फसवणूक केली. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पांगे करीत आहेत.

Exit mobile version