अजित पवार विधानावर ठाम
| मुंबई | प्रतिनिधी |
इतिहासाच्या आधारावर विधानसभेत बोललो, संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षकच म्हणायला हवं, मी माझी भूमिका मांडली. ज्यांना योग्य वाटलं त्यांनी स्वीकारावं, कुणी धर्मवीर म्हणेल तर तो त्यांचा प्रश्न स्वराज्यात सगळ्या जाती धर्माचे लोकं, अनेकांनी स्वतःला धर्मवीर म्हणून घेतलं. असा टोमणा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटला आहे. त्यावर पत्रकार परिषद घेत भाषणावर स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी काहीच चुकीच बोललो नाही. मी कधीच महापुरुषांबाबात चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नाही. मला विरोधीपक्ष नेते हे पद राष्ट्रवादीने दिलेलं आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. महापुरुषांचा अपमान करणार्या भाजप नेत्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा स्वतंत्र अधिकार असतो.असे मतही त्यांनी मांडले.
माझा काका जाणता जाणता राजा?
पवार यांना पत्रकाराने एक प्रश्न केला की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही जाणता राजा म्हणतात यावर भाजप आक्षेप घेतो. पत्रकाराच्या या प्रश्नावर अजित पवार यांनी अगदी मिष्किलपणे उत्तर दिलं आहे. ते म्हणाले आता मी म्हटलं का माझ्या काकाला जाणता राजा म्हणा? काय बोलतो राव. मी म्हणालो का की माझ्या काकाला तुम्ही जाणता राजा म्हणा. ज्यांनी तो शब्द प्रयोग केला त्याला जाऊन विचारा. आम्हाला कशाला विचारता? अशी मिष्किल टिपणी पवार यांनी केली.