चिरनेर गावात अवतरली शिवसृष्टी

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चिरनेर गावात गुरुवारी (दि.14) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची 369 वी जयंती येथील छावा प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात आली. ऐतिहासिक शिव थाटात साजऱ्या करण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीला शिवकालीन स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे चिरनेर गावात जणू शिवसृष्टी अवतरली होती. यावेळी शंभूराजांच्या पराक्रमाला मानाचा मुजरा करण्यात आला. धर्मवीर शंभूराजांच्या जयंतीच्या सोहळ्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.

आरंभी छत्रपती शंभुराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा आणि सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. दरम्यान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची महाआरती घेऊन, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीच्या माध्यमातून शंभूराजांचा पराक्रम व इतिहास साकारण्यात आला होता. शिवकालीन वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुण-तरुणी, बच्चे कंपनी आणि महिला पुरुषांमध्ये यावेळी उत्साह संचारला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषांनी चिरनेर गावातील वातावरण दुमदुमून गेले होते.

या मिरवणुकीत प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाबाई, महाराणी येसूबाई या महान स्त्री-पुरुषांच्या साकारलेल्या व्यक्तिरेखा दिसून येत होत्या. मिरवणुकीत अश्व नृत्याचा थरारही पाहायला मिळाला. त्याचबरोबर ढोल ताशा, फेट्यांचा थाट, महिला लेझीम पथकाची प्रात्यक्षिके यावेळी पाहायला मिळाली. सोबत हरीपाठातून संतांच्या नावाचा गजर होत होता. मिरवणुकीत पुष्पवृष्टीचा वर्षाव होत होता. यात प्रामुख्याने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व नाट्य अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी देखील सहभागी झाली होती.

Exit mobile version