| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील जसखार ही सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जात आहे. मात्र, गावातील अस्वच्छता, डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे चिकन गुनियाचे 21 रुग्ण गावात आढळून आल्याने रहिवासी भयभीत झाले असून, आरोग्य विभागाची एकच धावपळ उडाली आहे.
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असताना जसखार ग्रामपंचायत हद्दीतील 21 रहिवाशांना चिकन गुनियासारख्या आजाराने ग्रासले आहे. सदर रुग्ण हे खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार करुन घेत असल्याने गावातील इतर रहिवासी भीतीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत.
दरम्यान, गावात चिकन गुनिया सारख्या आजाराचे रुग्ण आढळून येऊ नयेत यासाठी तालुका आरोग्य विभागाचे डॉक्टर ,अधिकारी, परिचारिका, कर्मचारी हे सातत्याने रहिवाशांच्या संपर्कात आहेत. परंतु, रहिवाशांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच आजाराची लक्षणे दिसतात डॉक्टर उपचार करुन घेण्यासाठी रुग्णालयात दाखल व्हावे, अशा सूचनाही रहिवाशांना आरोग्य विभागाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. राजेंद्र इटकरे यांनी दिली.